नाशिक : नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात सततचे बदलते हवामान व अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष घड जिरणे, घड कुजणे व मणी गळणे यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
यंदा निफाड तालुक्यात द्राक्ष लागवड क्षेत्र तुलनेने कमी आहे. त्यातच मागील काळात झालेल्या पावसाचा उभ्या पिकांना फटका बसला. द्राक्षबागांमध्ये डाऊनीसह विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घड कुजणे, मणी गळणे, मणी फुटणे अशी समस्या निर्माण झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अनेक शेतकऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महागड्या औषधांच्या फवारण्या केल्या. मात्र, अपेक्षित लाभ झाला नाही. उलट काही शेतकऱ्यांना औषध फवारणीचा वाढता खर्चही परवडण्याजोगा नाही. यामुळे तालुक्यातील असंख्य द्राक्षबागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांना द्राक्षबाग तोडण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.
द्राक्ष उत्पादनावर परिणाम
अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष शेतीचा हंगाम वेळेआधीच संपल्याची स्थिती निर्माण झाली आहे. उभ्या बागांमधील घड जिरणे, मणीगळ व रोगांचा वाढता प्रादुर्भाव याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. महागड्या औषध फवारण्या करूनही रोग आटोक्यात आला नसून, वाढलेला खर्च आणि कमी हंगाम यामुळे द्राक्षशेतीचे नुकसान झाले आहे.
द्राक्षबागेसाठी लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र, सततच्या बदलत्या हवामानामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे घड जिरले. वर्षभराचे सर्वच नियोजन कोलमडले. घेतलेले कर्ज फेडायचे कसे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
- साहेबराव डेरे, द्राक्ष उत्पादक
मागील काळात सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा द्राक्षबागांवर परिणाम झाला आहे. जवळपास ४० टक्के भागांमध्ये घड जिरण्याचे परिणाम दिसून आले. द्राक्षपंढरी यावेळी संकटात असून, द्राक्ष उत्पादन कमी होण्याची चिन्ह दिसून येत आहे.
- सुनील सोनवणे, कृषी अधिकारी, पिंपळगाव
