Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture News : हँडसेट नसल्याने मोफत सिमकार्ड वापर शुन्य; १८७ कृषी अधिकारी प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 17:37 IST

Agriculture News : कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संपर्क कायम राहावा म्हणून शासनाने मोफत सिमकार्ड दिली; मात्र हँडसेट न मिळाल्याने या सिमकार्डचा वापरच होऊ शकलेला नाही. अकोला जिल्ह्यातील १८७ सहायक कृषी अधिकारी अद्याप सिमकार्ड स्वीकारण्याच्या प्रतीक्षेत आहेत. (Agriculture News)

अकोला : कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संपर्क अखंड राहावा, तसेच बदलीनंतरही संबंधित अधिकाऱ्यांचा मोबाइल क्रमांक कायम राहावा, या उद्देशाने शासनाच्या कृषी विभागामार्फत अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी मोबाइल क्रमांकाचे मोफत सिमकार्ड वितरित करण्यात आले. (Agriculture News)

मात्र या सिमकार्डचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेले हँडसेट उपलब्ध नसल्याने अकोला जिल्ह्यातील १८७ सहायक कृषी अधिकाऱ्यांनी अद्यापही ही सिमकार्ड स्वीकारलेली नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. (Agriculture News)

राज्यातील सर्व जिल्ह्यांत कृषी अधिकाऱ्यांसाठी हे सिमकार्ड वितरित करण्यात आले असून, अकोला जिल्ह्यासाठीचे सिमकार्ड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी काही सिमकार्ड वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वीकारण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष गावपातळीवर काम करणारे आणि शेतकऱ्यांशी थेट संपर्कात असलेले सहायक कृषी अधिकारी मात्र हँडसेटअभावी सिमकार्ड स्वीकारण्यास अनुत्सुक आहेत.

सिमकार्ड मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडेच पडून

मोफत सिमकार्डचा वापर करण्यासाठी स्वतंत्र हँडसेट आवश्यक असल्याचे सहायक कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या शासनाकडून हँडसेट उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने जिल्ह्यातील १८७ सहायक कृषी अधिकाऱ्यांनी सिमकार्ड स्वीकारलेली नाहीत. परिणामी, ही सिमकार्ड संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडेच पडून असल्याचे चित्र आहे.

स्वतःच्या मोबाईलवरूनच कामकाज

सहायक कृषी अधिकारी सध्या स्वतःच्या वैयक्तिक मोबाइल हँडसेट आणि क्रमांकावरूनच शेतकऱ्यांशी संपर्क साधत आहेत. 

शासनाकडून दिलेल्या सिमकार्डसाठी स्वतंत्र हँडसेट मिळाल्यासच त्याचा वापर करण्यात येईल, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे शासनाने सिमकार्ड वितरणासोबतच हँडसेट उपलब्ध करून देणे अपेक्षित असल्याची मागणी होत आहे.

हँडसेट कधी मिळणार?

मोफत सिमकार्ड देण्यामागील शासनाचा उद्देश चांगला असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीअभावी हा उपक्रम अडचणीत आला आहे. 

हँडसेट केव्हा उपलब्ध होणार, याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने सहायक कृषी अधिकारी प्रतीक्षेत आहेत. यामुळे शेतकरी–अधिकारी संपर्कासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचा अपेक्षित लाभ सध्या तरी पूर्णपणे मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

कायमस्वरूपी मोबाइल क्रमांकाचे मोफत सिमकार्ड मिळाले आहे; मात्र त्याचा वापर करण्यासाठी हँडसेट मिळणे आवश्यक आहे. सहायक कृषी अधिकाऱ्यांनी सिमकार्ड अद्याप स्वीकारलेले नसून, सध्या स्वतःच्या हँडसेटद्वारेच कामकाज सुरू आहे. शासनाकडून हँडसेट उपलब्ध झाल्यास मोफत सिमकार्डचा वापर निश्चितपणे करण्यात येईल. - धर्मेंद्र राठोड, सहायक कृषी अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष

एकूणच, शासनाकडून वितरित करण्यात आलेल्या मोफत सिमकार्डचा प्रत्यक्ष वापर सुरू होण्यासाठी मोफत हँडसेट उपलब्ध होणे अत्यावश्यक असून, याकडे आता जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांचेही लक्ष लागले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Agriculture News : अधिकाऱ्यांना मोफत सिमकार्ड मिळाले; वापरासाठी हँडसेट कधी? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Free SIMs Unused: Agriculture Officers Await Handsets in Akola

Web Summary : Akola agriculture officers haven't used free SIMs due to missing handsets. 187 officers await devices, using personal phones. Government handset provision is awaited for the SIMs' use.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती