Join us

Agriculture News : कांदा पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 40 हजार रुपये भरपाई, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 21:35 IST

Agriculture News : यावेळी संबंधित कंपनीचे अधिकारी व कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाई देण्याविषयी निर्देश दिले होते.

नाशिक : काही दिवसांपूर्वी देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. तणनाशक फवारल्याने संपूर्ण कांदा पिकाचे नुकसान झाले. यातील काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. 

काही दिवसांपूर्वी देवळा तालुक्यात विठेवाडी परिसरासह अन्य गावांत तणनाशक फवारणीमुळे कांद्याचे नुकसान झाले होते. लागवड केलेल्या उन्हाळी कांद्यावर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर शंभर एकरपेक्षा जास्त कांद्याचे संपूर्ण नुकसान झाले होते. यावेळी संबंधित कंपनीचे अधिकारी व कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाई देण्याविषयी निर्देश दिले होते.

त्यानुसार कळवण, देवळा, सटाणा या तालुक्यामधील तन नाशक फवारणीतून कांदा पिकाची झालेली नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना प्रति एकरी 40 हजार रुपये भरपाई मिळाली आहे. आज कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार राहुल आहेर, आमदार नितीन पवार, तसेच कृषी विभागाचे अधिकारी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या उपस्थितीत ही भरपाई देण्यात आली. 

या भरपाईतून शेतकऱ्यांचे झालेलं मोठं नुकसान भरून येणार नाही, परंतु भरपाईपोटी मिळालेली प्रति एकरी 40 हजार ही रक्कम शेतकऱ्यांना थोडाफार हातभार निश्चित लागेल. वरील भरपाई ही फक्त आयपीएल कंपनीच्या औषधामुळे झालेल्या कांदा पिकाच्या नुकसानीच्या बदल्यात आहे. अजून सिन्नर, निफाड, येवला या तालुक्यातील अनु प्रोडक्ट कंपनीच्या औषधाने नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा जोरदार पाठपुरावा सुरू राहील- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना  

टॅग्स :शेती क्षेत्रकांदाशेतीकृषी योजनामाणिकराव कोकाटे