जळगाव : केळी बागेत आंतरपीक म्हणून झेंडू फुलाची लागवड बात्सर येथील तरुण शेतकरी योगेश भागवत पाटील यांनी केली आहे. उत्पन्नाबरोबरच केळीवर येणाऱ्या सीएमव्ही व्हायरस सारख्या रोगाला प्रतिबंध यातून होत आहे. केळी बागेचा गोडवा व झेंडूचा सुगंध अशी आंतरपिकाची जोड देणारा हा नावीन्यपूर्ण प्रयोग आहे.
योगेश पाटील यांनी जून महिन्याच्या शेवटी तीन एकरावर ५००० केळींचे खोड लागवड केली. सुरुवातीला तीन महिने केळी बाग वाढीस लागेपर्यत आंतरपिकास जागा असते. मावासारख्या किडीपासून केळीत व्हायरस पसरतो व ही कीड आकर्षित करणाऱ्या झेंडू फुलाला त्यांनी निवडले. त्यासाठी कन्नड येथून रोपवाटिकेतून चार रुपयेप्रमाणे वीस हजारांत ५००० झेंडू फुलाची रोपे आणली.
दोन केळीच्या खोडांमध्ये एक रोप लावले. केळीबरोबर झेंडूही बहरला. गणेशोत्सवापासून झेंडू फुले निघू लागली. त्यांनी गणेशोत्सव ते दसऱ्यापर्यंत दोन तोडे केले. त्यातून अंदाजे तीस क्विंटल झेंडूची फुले बांधावरच पन्नास रुपये किलोप्रमाणे ठोक विक्री केली. दहा-पंधरा क्विंटल झेंडूची फुले जळगाव मार्केटमध्ये विक्री केली. दसऱ्यापर्यंत एक दीड लाखावर उत्पन्न त्यातून आले.
दिवाळीपर्यंत अजून १५ ते २० क्विंटल झेंडू फुलाचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे. दिवाळीला शेवटचा तोडा करून झेंडू उपटून टाकू (अतिवृष्टीने फटका) गाळ मिश्रित व उताराची जमीन असूनही सतत एक-दीड महिना चाललेला पाऊस व दोनदा झालेली अतिवृष्टी यामुळे झेंडू फुलाचे निम्मे उत्पादन घटले. दर पाच दिवसांनी तोडा अपेक्षित असताना पावसामुळे पंधरा दिवसांनी झेंडू फुलाचा तोडा झाला. यामुळे फुलांच्या उत्पन्नात काहीशी घट आली होती.
झेंडूची लागवड केल्याने, केळी व्हायरसला प्रतिबंध झाला. प्रत्येक केळी उत्पादकाने बागेत झेंडू लावावा. झेंडूची स्वतंत्र किंवा कपाशी सारख्या पिकात आंतरपीक म्हणून कन्नड भागात घाटावर लागवड करतात. केळीत झेंडू लावण्याचे नवीनच धाडस केले.
- योगेश भागवत पाटील, शेतकरी, बात्सर, ता. भडगाव