Join us

Agriculture News : पाच मिनटांत एकराची फवारणी, शेतकऱ्याने विकसित केले ट्रॅक्टरचलित बूम स्प्रेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:20 IST

Agriculture News : शेतकरी जितेंद्र बालकृष्ण बोढे या युवा शेतकऱ्याने फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टरचलित बूम स्प्रेअर विकसित केले आहे. 

- प्रवीण खिरटकर

Agriculture News : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात कोळसा खाणी, जीएमआर, वर्धा पॉवर असे विविध उद्योगधंदे असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपयोगी कामे करण्यासाठी मजूरवर्ग मिळणे फारच कठीण झाले आहे. प्रामुख्याने वरोरा तालुक्यात कापूस, सोयाबीन, तूर व भात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. 

हंगामात या पिकावरील येणाऱ्या किडी व रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करणे ही शेतकऱ्यांसाठी अतिशय जोखमीची बाब आहे. तंत्रशुद्ध फवारणी करणारा कुशल मजूर मिळणे फारच कठीण झाले आहे. 

तसेच खरीप हंगामामध्ये सोयाबीन व कापूस यासारख्या पिकांची वाढ जास्त होत असल्यामुळे साप, जंगली जनावरे इत्यादीपासून फवारणी करताना मजुराच्या जीविताला धोका उ‌द्भवू शकतो. या सर्व समस्यावर मात करीत वरोरा तालुक्यातील मौजा मजरा रै. येथील शेतकरी जितेंद्र बालकृष्ण बोढे या युवा शेतकऱ्याने फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टरचलित बूम स्प्रेअर विकसित केले आहे. 

मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनात व यूट्यूबची चित्रफीत पाहत या युवा शेतकऱ्याने तीन लाख रुपये किमतीचा फवारणी संच मध्य प्रदेशातील इंदोर येथून आणून स्वकल्पनेतून स्वतःच्या ट्रॅक्टरला जोडला. पिकाच्या १३ ते १४ ओळीला एकाच वेळी फवारणी करणे शक्य होते व ५ ते १० मिनिटात एक एकर क्षेत्राची फवारणी पूर्ण होते. ट्रॅक्टरच्या मागे ७०० लिटर क्षमतेची फवारणी टाकी बसविण्यात आली आहे.

या तरुण उद्योजक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतीची सोबतच परिसरातील शेतकऱ्याची फवारणी मजुराची समस्या मार्गी लावली आहे. सद्यस्थितीत फवारणीकरिता शेतकऱ्यांना मजुराची समस्या भेडसावत आहे, यावर मार्ग म्हणून ट्रॅक्टरचलित बुम फवारणी यंत्र किंवा ड्रोन फवारणीचा वापर शेतकऱ्यांनी वाढवावा याकरिता कृषी विभागाचा प्रयत्न सुरू आहे.- विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी, शेगाव बु.

 

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीकृषी योजना