नाशिक : कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2025 (Kharif Season) साठी विविध कृषी योजनांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वानुासर करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिक विभागातील (Nashik Division) 20 हजार 170 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली
संबधित 20 हजार शेतकऱ्यांना एकूण 145.62 कोटी रूपयांचा थेट लाभ मिळणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी 31 मे 2025 पर्यत आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर (Maha DBT Portal) सादर करावीत, असे आवाहन अशी माहिती नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
21 मे रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय खरीप नियोजन बैठकीत या नव्या पद्धतीस मान्यता मिळाली आहे. यात विविध कृषी योजनांचा समावेश आहे. नाशिक विभागात वैयक्तिक शेततळे योजनेत 1 हजार 639 शेतकरी, सूक्ष्म सिंचन योजनेत 11 हजार 734 शेतकरी, सामूहिक शेततळे व प्लास्टिक अस्तरीकरण योजनेत 142 शेतकरी, फलोत्पादन घटकांतर्गत 1 हजार 44 शेतकरी, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत 301 शेतकरी आणि कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून 3 हजार 783 शेतकरी या योजनांमध्ये लाभार्थी ठरले आहेत.
लाभार्थ्यांची यादी महाडीबीटी पोर्टल, कृषी विभागाच्या संकेतस्थळावर तसेच क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांच्या लॉगइनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणी मोबाइल क्रमांकार एसएमएस द्वारे सूचना संदेश पाठविण्यात आला आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा फार्मर आयडी वापरून माहिती तपासावी.
कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नाही. त्यांनी नजीकच्या सार्वजनिक सेवा केंद्रावर जाऊन तो प्राप्त करून घ्यावा. शेतकऱ्यांनी 31 मे 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचा अर्ज आपोआप रद्द केला जाणार आहे. योग्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना त्वरीत पूर्ण संमती प्रदान केली जाणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.