नंदुरबार : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम वर्ष २०२५-२६ अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकूण १५ मृद परीक्षण केंद्रांची उभारणी केली जाणार असून, यासाठी दहावी उत्तीर्ण तरुण व तरुणींना संधी देण्यात येणार आहे. प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रत्येकी एक लाख ५० हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून देण्यात येईल.
माती परीक्षण म्हणजे काय?माती परीक्षण म्हणजे शेतातील मातीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करणे. यात मातीमध्ये असलेल्या पोषक तत्त्वांचे प्रमाण, सामू, कर्ब (कार्बन) व क्षारतासारख्या गोष्टी तपासल्या जातात.
येथे करता येणार अर्जअर्ज तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद परीक्षण अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
कोण अर्ज करू शकेलअर्ज करणाऱ्या तरुण-तरुणींनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, वयाची मर्यादा १८ ते २७वर्षे इतकी आहे. शेतकरी उत्पादक संस्था, कृषी क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्र, माजी सैनिक, बचतगट, किरकोळ खत विक्रेते, शाळा-महाविद्यालय, युवक व युवती असे अनेक पात्र घटक अर्ज करू शकतात. अर्जाची छाननी जिल्हा पातळीवरील समितीमार्फत केली जाणार असून, लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
प्रयोगशाळेसाठी शासनाकडून आर्थिक मदतया प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे. प्रत्येक प्रयोगशाळेसाठी दीड लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करून स्वतःची प्रयोगशाळा तयार करावी व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
असे मिळणार मृद तपासणीवर अनुदानप्रत्येक प्रयोगशाळेची वार्षिक मृद नमुना तपासणी क्षमता तीन हजार नमुने इतकी असणार आहेत. यातील पहिल्या ३०० नमुन्यांच्या तपासणीसाठी दर नमुन्यावर ३०० रुपये शासनाकडून दिले जातील. त्यानंतर पुढील ५०० मृद नमुन्यांना २० रुपये प्रति नमुना याप्रमाणे प्रोत्साहन निधी देण्यात येईल. उर्वरित दोन हजार २०० नमुन्यांची तपासणी संबंधित प्रयोगशाळा स्वतःच्या खर्चावर शासन दरानुसार शेतकऱ्यांकडून शुल्क आकारून करू शकेल.
अधिक वाचा : E Pik Pahani : शेतात नेटवर्क नसले तरी पीक पाहणी करता येईल, हे सोपे उपाय करून पहा