Join us

Kharif Season : खरीप हंगामाची तयारी : भात, नाचणी, द्राक्ष आणि टोमॅटोसाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 2:20 PM

नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने कांदा, द्राक्ष, भाजीपाल्यासह पश्चिम पट्ट्यात भात, नागली आदी पिके घेतली जातात.

सद्यस्थितीत खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरु असून नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने कांदा, द्राक्ष, भाजीपाल्यासह पश्चिम पट्ट्यात भात, नागली आदी पिके घेतली जातात. आता काही दिवसात भात, नागली आदी पिकांची लागवड होणार असल्याने याबाबत विभागीय संशोधन केंद्राच्या माध्यमातून कृषी सल्ला देण्यात आला आहे. नेमकं काय आवाहन हे आपण पाहुयात... 

भात (पूर्व मशागत)

भात पिकाचे चांगल्या प्रतीचे सुधारित वाण जसे इंद्रायणी, फुले समृद्धी, भोगावती व फुले राधा विकत घेण्याचे नियोजन करावे. भात पिकाच्या योग्य वाढीसाठी शेताची योग्य प्रकारे पूर्वमशागत करणे अत्यंत महत्वाचे असते. पूर्वमशागतीमुळे जमिनीच्या विविध थरांची उलथापालथ होते आणि काही प्रमाणात तण, कीड व रोगांचेही नियंत्रण होते.सेंद्रिय खतांचा वापर : नांगरणीच्या वेळी हेक्टरी १० मे. टन शेणखत अथवा कंपोस्ट खत मातीमध्ये पूर्णपणे मिसळून द्यावे.

नाचणी (पूर्व मशागत)

सुधारित वाणः फुले नाचणी, दापोली-१, दापोली सफेद, दापोली-२, फुले कासारी. २५ ते ३० सें.मी. खोली असलेल्या उथळ जमिनीची एक नांगरणी उतारास आडवी आणि दोन कुळवाच्या पाळ्या देणे, पेरणीपूर्वी मशागत करताना सेंद्रिय खताची मात्रा ५ टन / हेक्टरी मिसळावे.

द्राक्षे

उष्ण हवामानाचा अंदाज लक्ष्यात घेता द्राक्ष बागेत अचानक फुटी सुकण्याची समस्या आढळून आल्यास बागेत नवीन फुटी निघत असताना एकतर शेडनेटचा वापर करून फुटी झाकून घ्याव्यात. जवळपास सपकैन होईपर्यंत अधूनमधून पाण्याची फवारणी करत राहावी. यामुळे पानातील पेशींमध्ये योग्य रस टिकून राहण्यास मदत होईल. जमिनीमध्ये मुळांच्या कक्षेत वाफसा स्थिती राहील, अशाप्रकारे पाण्याचे नियोजन असावे. वाढत्या तापमानात सुरुवातीच्या काळात तीन ते चार पाने अवस्थेपासून वेलीला नत्र आणि पाणी पुरेसे मिळेल, याची काळजी घ्यावी. ज्या बागेत विरळणी होऊन फुटींचा जोम टिकून आहे, अशा ठिकाणी सपकैन करणे गरजेचे आहे.

कांदा (साठवणूक)

कांदाचाळीतील तापमान अधिक व आर्द्रता कमी असल्यामुळे वजनात घट होते. साठवणगृहातील तापमान व आर्द्रता यांचा विचार करणे आवश्यक असते. म्हणून नैसर्गिक वायुवीजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना केल्यास तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणुकीतील नुकसान कमी करता येऊ शकते.

टोमॅटो

टमाटे पिकवाढीच्या अवस्थेनुसार योग्य काळजी घेणे गरजेचे असते. आंतरमशागत, पाणी आणि खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण आदी बाबींचे नियोजन वाढीच्या अवस्थेनुसार करावे. वाढते तापमान लक्ष्यात घेता टमाटे पिकातील फुलगळ नियंत्रणासाठी शेडनेटचा वापर करून पीक झाकून घ्यावे, पाण्याचा ताण बसणार नाही याकरिता पाण्याचे व्यवस्थापन करावे, रोग व किडींचे एकात्मिक व्यवस्थापन तसेच तज्ज्ञांच्यासल्ल्यानुसार एन.ए.ए. या वाढ संप्रेरकाच्या २० पीपीएम द्रावणाची फक्त फुलोऱ्यावर फवारणी करावी.

टॅग्स :शेतीनाशिकशेती क्षेत्रइगतपुरी