Join us

Aghada Ranbhaji : अठरा आजारांवर एकच उपाय आघाड्याची भाजी, वाचा फायदे आणि रेसिपी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 20:45 IST

Aghada Ranbhaji :   महाराष्ट्रात सर्वत्र ही रानभाजी आढळते. पाने साधी, एकासमोर एक,मऊ,केसाळ, फिकट हिरव्या रंगाचे असतात फुलांचे दांडे फांद्यांच्या टोकांवर येतात.

Aghada Ranbhaji :  महाराष्ट्रात सर्वत्र ही वनस्पती आढळते. पाने साधी, एकासमोर एक,मऊ,केसाळ, फिकट हिरव्या रंगाचे असतात फुलांचे दांडे फांद्यांच्या टोकांवर येतात. फळांवर लहान टोकदार काटे असल्याने अंगाला, कपड्यांना चिकटतात. आघाड्याला ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात फुले-फळे येतात. 

आघाडा भाजी कशी बनवायची 

साहित्य-                                   आघाड्याची कोवळी पाने, लसूण, कांदा, डाळीचे पीठ, तेल, तिखट, मीठ, जिरे-मोहरी

कृती - 

  • आघाड्याची पाने धुऊन, चिरून घ्यावीत. 
  • कढईत तेल घेऊन त्यात जिरे मोहरीची फोडणी करून घ्यावी. 
  • त्यात लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात. 
  • नंतर चिरलेली भाजी, तिखट, मीठ घालून चांगली वाफ येऊ द्यावी. 
  • भाजी अर्धवट शिजल्यावर डाळीचे पीठ हळूहळू भुरभुरुन टाकावे. सतत भाजी हलवत राहावी. 
  • एकसारखे हलवत राहिल्याने भाजी मोकळी होते. भाजी मंद गॅसवर शिजवून घ्यावी. 
  • भाकरी किंवा चपाती सोबत खायला अतीशय चविष्ट लागते.      

 

या रानभाजीचे फायदे 

  • पित्ताश्मरीत व अस्थी रोगात आघाडा वापरतात. आमवात, क्षारयुक्त संधीशोध, गंडमाळा या रोगांत आघाडा गुणकारी आहे.
  • आघाडा मूत्रजनन आहे. त्याची क्रिया मूत्रपिंडातील मूत्रजनक पेशींवर होते. यामुळे आघाडा मूत्रपिंडोदरात उत्तम कार्य करतो. 
  • आघाड्यामुळे लघवीची आम्लता कमी होते. मूत्रनलिकेचा दाह आघाड्यामुळे कमी होतो. 
  • यामुळे बस्तिशोथ, मूत्रपिंड शोथ, तसेच मूत्रंद्रियांच्या रोगात आघाडा वापरतात.
  • शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत.
  • श्वासनलिकाशोथ व कफरोगात आघाड्याचा क्षार हे उपयुक्त औषध आहे.
  • विषमज्वरात आघाड्याची राख किंवा मुळाचे चूर्ण खायच्या पानांच्या रसातून देतात.
  • आघाड्यात विषनाशक गुणधर्म आहेत. उंदराच्या विषावर कोवळ्या पानांचा व तुऱ्यांचा रस मधाबरोबर देतात.
  • विंचूदंशावर आघाड्याचा पाला वाटून लावतात तसेच मूळ उगाळून पिण्यास देतात.
  • रातांधळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण देतात.
  • जेवण्यापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो, तर जेवणानंतर दिल्यास आम्ल पित्ताच्या त्रास कमी होतो.
  • यकृतावर आघाड्याची क्रिया फार हितावह आहे. यामुळे यकृताच्या सर्व क्रिया सुधारतात.
  • पित्ताश्मरीत व अर्थ रोगात आघाडा वापरतात. आमवात, क्षारयुक्त संधिशोथ, गंडमाळा या रोगांत आघाडा गुणकारी आहे.                                
  • दातदुखीत पानांचा रस हिरड्यांवर चोळतात किंवा आघाड्याचा क्षार किडलेल्या दातांमध्ये भरतात.
  • चामखीळ काढण्यासाठी आघाड्याचा क्षार वापरतात.
  • कानात मळ साठून कानदुखी किंवा कानात सतत नाद व आवाज होणे या विकारात आघाड्याचा क्षार तिळाच्या तेलात उकडून, वस्त्रगाळ करून ते तेल कानात घालतात.
  • सांधेवातात आघाड्याची पाने ठेचून, गरम करून दुखणाऱ्या सांध्यावर बांधतात.
  • अंगात काटे शिरल्यास आघाड्याचा अंगरस देतात व पाने वाटून जखमेवर लावतात.                                

- श्रीमती सोनाली कदम, सहाय्यक कृषी अधिकारी, आडगाव चोथवा, तालुका-येवला जिल्हा-नाशिक

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीभाज्यापाककृती