Join us

फार्मर आयडी बंधनकारक, तरीही नाशिक जिल्ह्यात 'इतके' शेतकरी फार्मर आयडी विना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:03 IST

Agri stack Farmer Id : २४ जूनपर्यंत नाशिक जिल्ह्यात ६४ हजार ६४८ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंद केली आहे. 

नाशिक : नाशिक जिल्ह्यात फार्मर आयडीच्या (farmer ID) नोंदणीसाठी प्रयत्न सुरू असले तरी अद्याप सुमारे ३३ टक्के शेतकरी फार्मर आयडी शिवाय आहेत. येत्या ३० तारखेपर्यंत नोंदणीची मुदत असून केवळ सहा दिवसांच्या कालावधीत ३३ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी कशी पूर्ण होणार हा प्रश्न आहे.

शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अॅग्रीस्टॅक योजनेच्या (Agri Stack Scheme) अंमलबजावणीस मालेगाव तालुक्यात सुरुवात झाली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी मुंगसे, टेहरे, निमगाव, वजीरखेडे, करंजगव्हाण आदी गावात तहसील व तालुका कृषी विभाग कार्यालयामार्फत शिबिर घेण्यात आले. यात २४ जूनपर्यंत ६४ हजार ६४८ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंद केली आहे. 

मालेगाव तालुक्यात अद्याप ६५.११ टक्केच शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु जनजागृती सभा घेऊन सुद्धा उर्वरित ३४ हजार ६४९ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीकडे दुर्लक्ष केले आहे. अद्याप ३४.८९ टक्के शेतकरी बाकी आहेत. यामुळे असे शेतकरी शासनाच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

मालेगाव तालुक्यात ९९ हजार २९७ शेतकरी असून २४ जूनपर्यंत केवळ ६४ हजार ६४८ शेतकऱ्यांनीच फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली आहे. उर्वरित ३४ हजार ६४९ शेतकऱ्यांची नोंदणी होणे अद्याप बाकी आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे.

सुरगाणा तालुका अव्वलफार्मर आयडी नोंदणीत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील शेतकन्यांनी सर्वाधिक नोंदणी केली आहे. सुरगाणा तालुक्यात ८४ टक्के, बागलाण ६१ टक्के, चांदवड ७१ टक्के, देवळा ७३ टक्के, दिंडोरी ६५ टक्के, इगतपुरी ६५ टक्के, कळवण ६२ टक्के, नांदगाव ६६ टक्के, निफाड ७० टक्के आणि सिन्नर तालुक्यात ६६ टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात अद्याप ६७.५३ टक्केच शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे.

कृषी विभागाच्या सर्व योजनांच्या लाभासाठी, पीक विमा, पीक कर्ज तसेच नैसर्गिक आपत्ती अनुदानासाठी शासनाने फार्मर आयडी बंधनकारक केलेला असून कोणताही शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, म्हणून प्रलंबित शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरवर जाऊन त्वरित फार्मर आयडी काढून घ्यावा व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. यामुळे भविष्यामध्ये विविध योजनांचा लाभ घेण्यामध्ये अडचण येणार नाही.- भगवान बी. गोर्डे, तालुका कृषी अधिकारी, मालेगाव

टॅग्स :कृषी योजनाशेतीशेती क्षेत्रनाशिक