Agriculture News : राज्यात सर्वदूर पाऊस सुरू असल्याने पेरणीला देखील वेग आला आहे. आज एक जुलै पर्यंत ८८.८१ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ११२ टक्के पेरणी अधिक झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. आतापर्यंत झालेल्या पेरणीत सरासरीच्या तुलनेत सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे.
राज्यातील पाच वर्षाचे सरासरी क्षेत्र पाहिले असता १४४.३६ लाख हेक्टर असून मागील वर्षी २० सप्टेंबरपर्यंत अंतिम पेरणी ही १४५.८२ लाख हेक्टर झाली होती. तर मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत जवळपास ७९.५३ लाख हेक्टर पेरणी झाली होती तर यांना मात्र ८८.८१ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.
दरम्यान एक जुलै पर्यंत सर्वाधिक पेरणी झालेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर ८६ टक्के, लातूर ८६ टक्के, छत्रपती संभाजीनगर ८२ टक्के, नांदेड ७८ टक्के तर जळगाव ७८ टक्के अशी सरासरीच्या तुलनेतील आकडेवारी आहे.
तर आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत कमी पेरणी झालेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, भंडारा, गोंदिया, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच अधिकतम पेरणी झालेल्या पाच पिकांमध्ये सरासरीच्या तुलनेत मका १०० टक्के, उडीद ७२ टक्के, सोयाबीन ७२ टक्के, कापूस ६७ टक्के, तूर ६१ टक्के इतकी पेरणी झाली आहे.
तर विभागनिहाय पेरणी पाहिली असता एक जुलै अखेर कोकण विभागात दहा टक्के, नाशिक विभागात ६४ टक्के, पुणे विभागात ६६ टक्के, कोल्हापूर विभागात ४३ टक्के, छत्रपती संभाजी नगर विभागात ७३ टक्के, लातूर विभागात ७५ टक्के, अमरावती विभागात ६८ टक्के, नागपूर विभागात ३० टक्के अशी एकूण ६२ टक्के पेरणी झाल्याचं अहवालातून नमूद करण्यात आले आहे.