नाशिक : यंदा परतीच्या पावसाने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नगदी पीक असलेल्या उन्हाळ कांद्याचे ९० टक्के रोपांनी वाफ्यातच माना टाकल्या. त्यामुळे उन्हाळ कांद्याची आतापर्यंत फक्त २३ टक्के लागवड झाली असून उर्वरित कांदा लागवड महिनाअखेरपर्यंत होणार असा अंदाज आहे. यंदा रब्बी मकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असून १४० टक्के पेरणी झाली आहे.
यंदा पर्जन्यमान समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक असलेल्या कांदा लागवडीकडे आपला मोर्चा वळवला. मात्र कांदा लागवडीसाठी प्रथम रोप तयार करणे गरजेचे असते. महागडे उळे (कांदा बी) खरेदी करून मातीआड केले. मात्र, परतीच्या पावसाने नुकत्याच कॉब फुटलेल्या कांदा रोपांचे नुकसान झाले. रब्बी हंगामाच्या मशागतीला उशीर झाला. पोळ व रांगडा कांदा उत्पादनात कमालीची घट झाली. कांदा अत्यल्प बाजारभावाने विकावा लागला.
उन्हाळा कांदा लागवड पर्जन्यमान चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात सुरू असून गहू पिकाचे क्षेत्र ही यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढेल. कांदा पिकांची लागवड व गहू पिकाची पेरणी करताना शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया जरूर करावी. - शुभम बेरड, तालुका कृषी अधिकारी, येवला
खरीप हंगामात मका पिकाचे चांगले उत्पन्न आले आहे. मात्र, लाल कांदा व रांगडा कांदा लागवडीनंतर पाऊस झाल्याने कांदा पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पन्नात घट झाली आहे. - रावसाहेब ठोंबरे, पुरणगाव, ता. येवला
अशी आहे पिकांची स्थितीपीक उद्दिष्ट हेक्टर) प्रत्यक्ष पेरणी टक्केकांदा - २३.३३ज्वारी - ७.८७गहू - ३१.६३मका - १४०.०६हरभरा - २४.९९
गळीत धान्य हद्दपारयेवला तालुक्यात दोन-अडीच दशकांपूर्वी सूर्यफूल, इतर गळीत धान्याचे उत्पादन घेतले जायचे. मात्र, हळूहळू गळीत धान्य पेरणी आता तालुक्यातून हद्दपार झाली आहे.