- सुनील चरपेनागपूर : सरकारने जीनाेम संपादित तांदळाच्या (Jinom Rice) दाेन वाणांना परवानगी दिली आहे. हायब्रिड कापसाची (Hybrid Cotton) उत्पादकता व उत्पादन घटक असून, खर्च वाढत असल्याने उत्पादन घेणे कठीण झाले आहे. बियाण्यांचे उत्पादन मर्यादित असून, वापर वाढत असल्याने काळाबाजार हाेत आहे. हा काळाबाजार थांबविण्यासाठी कापसाचे सरळ वाण उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.
भारत वगळता जगातील कापूस उत्पादक (cottton farmers) देशांमध्ये बीटी कापसाचे सरळ वाण वापरले जाते. सन २०१५ पासून भारतीय शेतकऱ्यांना बीटी कापसाचे सरळ वाण उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे सातत्याने केली जात आहे. कृषी निविष्ठांचा वापर व दर वाढले असून, मजुरांची कमतरता व वाढलेल्या मजुरीमुळे कापसाचा उत्पादनखर्च वाढला आहे. तुलनेत कापसाचे उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी हाेत आहे. घन व अतिघन लागवडी पद्धतीमुळे बियाण्यांचा वापर प्रतिएकर दाेन पाकिटांवरून तीन ते सहा पाकिटांवर गेला आहे.
देशात बीटी कापसाच्या बियाण्यांचे उत्पादन मर्यादित असल्याने तुटवडा निर्माण हाेऊन काळाबाजार हाेत आहे. प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे चाेरून विकले जात असल्याने हा तुटवडा लक्षात येत नाही. हायब्रिड बियाण्यांमध्ये बीटी जनुके पूर्ण क्षमतेने सक्रिय हाेत नसल्याने कापसावरील गुलाबी बाेंडअळीचा धाेका, त्यातून हाेणारे नुकसान व खालावणारा रुई व सरकीचा दर्जा कायम आहे. या बाबी सरळ वाणामध्ये टाळल्या जात असल्याचे जगभरातील संशाेधन व वापरावरून सिद्ध झाले आहे, अशी माहिती कृषितज्ज्ञ विजय जावंधिया यांनी दिली.
सीआरवाय-१ एसी जनुकांचा वापर का नाही?पेटेन्ट ॲक्टनुसार सीआरवाय-१ एसी (एमओएन-५३१) या जनुकाची राॅयल्टी सन २०१२ मध्ये संपुष्टात आली आणि हे जीन राॅयल्टीमुक्त झाले. याच जीनचा वापर जीनाेम संपादित तांदळाचे दाेन वाण विकसित करण्यासाठी केला आहे. मग याच जनुकाचा वापर आजवर बीटीकापूस बियाण्यांमध्ये का केला नाही, याचे उत्तर कुणीही देत नाही.
सरळ वाणासाठी बियाणे कंपन्यांना शेतकऱ्यांकडून राॅयल्टी हवी आहे. केंद्र सरकार याला परवानगी देत नाही. हायब्रिड बियाणे हाय इल्ड नसून, खते, पाणी याला हाय रिस्पाॅन्स आहे. हायब्रिउ बियाण्यांमुळे उत्पादनात फारसी वाढ हाेत नाही. काेरडवाहू उत्पादनासाठी सरळ वाण फायदेशीर ठरते, हे अनुभवावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे सरकारने भारतीय शेतकऱ्यांना बीटी कापसाचे सरळ वाण उपलब्ध करून द्यायला हवे.- विजय जावंधिया, कृषितज्ज्ञ.