धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथे बियाणे निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांच्या पथकाने छापा टाकून शासनाची मान्यता नसलेली व विनालेबल अनधिकृत कापूस बियाणांचा सव्वा लाखांचा साठा जप्त केल्याची घटना सोमवारी घडली.
याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यासह बियाणे उत्पादक व विक्री करणाऱ्या कंपनीशी संबंधित अज्ञात व्यक्ती अशा एकूण सहाजणांवर शेतकऱ्यांसह शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बियाणे निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दि. १९ रोजी भरदिवसा छापा टाकत कारवाई केली. यात सूर्यकांत बन्सीलाल गुजर ऊर्फ पंकज पटेल (रा. भरवाडे, पो. टेकवाडे, ता. शिरपूर) याच्याकडून उत्पादक व विक्रेत्याचे नाव, लॉट क्रमांक, लेबल क्रमांक, तपासणी दिनांक, अंतिम वैधता क्रमांक यांसारख्या आवश्यक माहितीसह नसलेली कापूस बियाणांची पाकिटे जप्त करण्यात आली.
संबंधित बियाणे जीई-सीची मान्यता नसलेल्या वाणांची असल्याचे निष्पन्न झाले. ही बियाणे एचआयबीटी कापूस वाण आर-२६५९, पिंक पार्टनर, सिल्व्हर आर आणि विडगार्ड यांची असून, त्यांच्या उत्पादन व विक्रीसाठी शासनाची मंजुरी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे बियाणे शेतकऱ्यांना विक्रीस ठेवण्यात आली होती.
याप्रकरणी सूर्यकांत बन्सीलाल गुजर ऊर्फ पंकज पटेल (रा. भरवाडे, पोस्ट टेकवाडे, ता. शिरपूर), गुजरात येथील भरतकुमार दुलाभाई पटेल (रा. अहमदाबाद) तसेच वरील बियाणांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या चार अज्ञात व्यक्तींविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.
हेही वाचा : सरकी ते कापूस कसा आहे कपाशीचा जीवनक्रम? जाणून घ्या सोप्या शब्दांत