संतोष वानखडे
उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) (Umed) अंतर्गत 'लखपती दीदी' (Lakhpati Didi Yojana) उपक्रमाच्या उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर यवतमाळ जिल्हा तळाला आहे.
राज्यस्तरावरून ३ एप्रिल रोजी या योजनेतील जिल्हानिहाय उद्दिष्टपूर्तीची रँकिंग जाहीर करण्यात आली. त्यात वाशिम जिल्ह्याने अपेक्षेपेक्षा अधिक महिलांना'लखपती दीदी' बनवून १०३ टक्के कामगिरी केली आहे. (Lakhpati Didi Yojana)
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने २०२३ मध्ये 'लखपती दीदी' हा उपक्रम सुरू केला. वाशिम जिल्ह्याला ३८,३९७ महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचे उद्दिष्ट होते. (Lakhpati Didi Yojana)
प्रत्यक्षात ३९,६९३ महिला वार्षिक १ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या ठरल्या.दुसऱ्या क्रमांकावर अकोला जिल्हा असून, उद्दिष्ट ४९,२२२ असताना ५०,१४२ महिला 'लखपती दीदी' झाल्या. (Lakhpati Didi Yojana)
'लखपती दीदी' कोण?
'लखपती दीदी' हा एक असा उपक्रम आहे, ज्यामध्ये स्वयंसहायता गटांमधील महिला दोन किंवा तीन वेगवेगळ्या उत्पन्न स्रोतांचा वापर करून वार्षिक उत्पन्न किमान १ लाख रुपये कमावतात.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात, तसेच बचत गट आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून वाशिम जिल्ह्यात 'लखपती दीदी'ची उद्दिष्टपूर्ती १०३ टक्के झाली. राज्यात वाशिम जिल्हा अव्वल आहे. - सुधीर खुजे, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद अभियान, जिल्हा परिषद, वाशिम
राज्यात 'टॉप फाइव्ह' जिल्हे उद्दिष्टपूर्ती टक्केवारी
वाशिम | १०३ |
अकोला | १०२ |
गोंदिया | १०० |
पुणे | ९७ |
सिंधुदुर्ग | ९३ |