मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता आचारसंहितेत अडकू नये यासाठी ऑक्टोबर महिन्यातच दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते.
आता नवीन सरकार स्थापन झाले असून, डिसेंबर महिन्याचा हप्ता बँकेत कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. महिलांचे सशक्तीकरण व्हावे या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.
पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करण्यास प्रारंभ झाला होता. राज्यामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे महिलांसाठी राज्यसरकाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले.
आतापर्यंत मागील पाच महिन्यात महिलांना ७,५०० रुपये खात्यात जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहितामुळे या योजनेचे अंमलबजावणी करता आली नाही.
परंतु आता आचारसंहिता संपली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह नवे मंत्रिमंडळ ही अस्तित्वात आलेले आहे तेव्हा डिसेंबरचा हप्ता कधी आणि किती रुपयांचा जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
२१०० मिळणार का?
- विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षाकडून लाडकी बहिण योजनेला प्रचाराचा मुद्दा बनवला होता.
- निवडून आल्यानंतर यात वाढ करून दरमहा २१०० रुपये हप्ता करण्यात येईल, असे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते.
- आता पुन्हा महायुतीचे सरकार निवडून आल्याने लाडक्या बहिणींना २१०० रुपये हप्ता मिळणार का? याकडे आता लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
निकषात बदल होणार का? धाकधूक वाढली
१) लाडकी बहिणी योजनेचा अर्ज सादर करताना काही निकष लावण्यात आले होते.
२) एका कुटुंबात दोनच महिलांना लाभ दिला जाणार, आयकर भरणाऱ्यांना लाभ घेता येणार नव्हता, मात्र अर्ज यशस्वी भरणा झाल्यानंतर पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात रक्कम जमा होत होती.
३) यात काही ठिकाणी दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आल्याचा तसेच आयकर भरणा करणाऱ्या कुटुंबातील महिलांनी सुद्धा लाभ घेतला असल्याचा आरोप होत आहे.
४) निकषांमध्ये बदल होणार असल्याची चर्चा रंगत आहे.
५) निकष बदलाविषयी प्रशासनाला कोणतेही आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत मात्र तरीही धाकधूक लागलेली आहे.