रामेश्वर बोरकर
प्रयागराज येथील कुंभमेळ्या करीता देश विदेशातून भावीक भक्त दाखल होत आहेत. ग्रामीण भागातून देखील मोठ्या संख्येने नागरिक कुंभमेळा करीता रवाना होत आहेत.
यातच आता नांदेड जिल्ह्यातील निवघा ( बा.) परिसरातील ईरापुर येथील शेतकऱ्याची केळी थेट प्रयागराज कुंभमेळा येथे उच्चांकी दराने विक्री करीता गेली आहे.
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापुर, वारंगा या भागात केळीचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतू हदगाव तालुक्यात केळीचे पिक तुरळक शेतकरी घेतात.
हदगाव तालुक्यातील विदर्भाच्या सिमेवर असलेल्या छोट्याशा ईरापुर गावातील राजेश्वर दत्तराव देशमुख या शेतकऱ्याने मार्च २०२४ मध्ये अडीच एकर क्षेत्रात नामांकीत टिश्यू कल्चर रोपांची लागवड केली होती.
सध्या बाजारपेठेत फळांची आवक आहे. दरम्यान पुसद (जि. यवतमाळ) येथील इम्रान बागवान यांना राजेश्वर देशमुख यांचा केळीचा बाग काढणीस आल्याची माहिती मिळाली. यामुळे ते केळीचा बाग पाहणी करीता आले होते.
ज्यात सदरील देशमुख यांची केळी बागेचा २ हजार १०० रुपये या उच्चांकी दराने त्यांनी खरेदी व्यवहार केला. तसेच आता ही केळी आम्ही प्रयागराज येथील कुंभमेळा करीता पाठवत असल्याचे सांगितले.