Kharif season: खरीप हंगामात (Kharif season) बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री थांबवण्यासाठी कृषी विभागाने पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांच्या (farmers) तक्रारींसाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून, तक्रार दाखल होताच तत्काळ कारवाई होणार आहे.
अकोला येथील जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले असून विक्री केंद्रांवर पेयजल, सावली आणि सीसीटीव्हीसारख्या सुविधा बंधनकारक करण्यात आल्या आहेत.
खरीप हंगामात (Kharif season) बोगस बियाणे, खत आणि औषधांची विक्री करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना (farmers) मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. या प्रकाराला आळा घालण्याकरिता कृषी विभागाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. या क्रमांकावर तक्रार दाखल होताच त्यावर थेट कारवाई केली जाणार आहे.
येणाऱ्या खरीप हंगामात (Kharif season) शेतकऱ्यांना (farmers) उत्तम दर्जाचे बी-बियाणे, रासायनिक खते व इतर कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्या, शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्या तक्रारी दाखल करता याव्या यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांनी सुरुवातीपासूनच सजग राहून कार्यवाही करावी, खते, बियाणे विक्रीत इतर उत्पादन लिंकिंग करू नये. एका उत्पादनाबरोबर दुसरे उत्पादन घेण्याची बळजबरी करू नये. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिला.
कारवाई करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विक्री होणारे बी-बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उपलब्धता व्हावी यासाठी पूर्ण खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यामध्ये कोठे बोगस बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके आढळून आल्यास किंवा तसा संशय आल्यास त्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांना द्यावी. त्यावर ते थेट कारवाई करतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तक्रारीची माहिती गोपनीय असेल
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना बी-बियाणे, रासायनिक खते किंवा कीटकनाशके या संबंधित तक्रार नोंदविण्याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला. या तक्रारीची माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
कृषी सेवा केंद्रांवर पेयजल, सावलीची व्यवस्था
* कृषी सेवा केंद्रांवर निविष्ठांचे उपलब्ध साठा आदी माहितीचे सुस्पष्ट फलक असणे आवश्यक आहे. तसेच, वाढते ऊन पाहता सावलीची व्यवस्था, पेयजल, सीसीटीव्ही, आदी सुविधा ठेवाव्या लागणार आहे.
* शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. विक्री केंद्रांनी फलक व इतर सुविधा उपलब्ध ठेवल्या किंवा कसे, याबाबत कृषी सहायकांच्या माध्यमातून तपासणी करून सात दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.