Join us

Jowar Perani : यंदा परतीच्या पावसामुळे ज्वारीच्या पेरण्याला उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 17:26 IST

सांगोला तालुक्यात रब्बी हंगामात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीच्या पेरणीला सुरुवात केली आहे.

सांगोला : सांगोला तालुक्यात रब्बी हंगामात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीज्वारीच्यापेरणीला सुरुवात केली आहे. तालुक्यात सोमवार, दि. ७ ऑक्टोबरपर्यंत ज्वारी १,३८४ हेक्टर तर मका १,०९४ हेक्टर असे एकूण २,४७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

दरम्यान तालुक्यात ४६८ मि.मी. सरासरीपेक्षा अधिक ६१२ मि.मी. म्हणजे १२४ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यात दररोज कोठे ना कोठे तरी पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे पेरणीत व्यत्यय येऊ लागल्यामुळे ज्वारीच्या पेरण्या विलंबाने होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सांगोला तालुका तसा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार १५ सप्टेंबरनंतर शेतकरी रब्बी ज्वारी पेरणीला सुरुवात करतो; मात्र मध्यंतरी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत होता.

गणपती विसर्जनानंतर एकही पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. अशातच परतीच्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे.

दरम्यान १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर रब्बी ज्वारी पेरणीसाठी योग्य वेळ होती. आता १५ नोव्हेंबरपर्यंत रब्बी ज्वारीच्या पेरण्या चालणार असल्या तरी विलंबाने होणाऱ्या पेरण्यामुळे उत्पादनावरही परिणाम होणार आहे. 

अशातच तालुकाभर अजूनही खरीप बाजरी, मकेची काढणी-मोडणी व मळणी सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीसाठी मशागत करून ठेवलेल्या शेतामधून ज्वारीच्या पेरणीला सुरुवात केली आहे.

सांगोला तालुक्याच्या पावसाची सरासरी ४६८:०३ मि.मी. असून तालुक्यात १ जून ते ७ ऑक्टोबरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक ६१२ मि.मी. (१२४ टक्के) म्हणजेच १४४ मि.मी. अधिक पाऊस झाला आहे. सध्या ज्या शेतात वाफसा आहे, तेथे शेतकऱ्यांकडून ज्वारीची पेरणी चालू आहे. वाफसा आल्यानंतर रब्बी ज्वारीच्या पेरणीला वेग येणार आहे. - शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, सांगोला

टॅग्स :पेरणीज्वारीपीकशेतीरब्बीपाऊस