Jowar Kharedi : गेल्या महिनाभरापूर्वी शासनाने सोयगाव शहरात शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली असतानाही अद्याप प्रत्यक्ष खरेदीस सुरूवात झालेली नाही. कारण खरेदी केलेली ज्वारी ठेवण्यासाठी गोदामच उपलब्ध नाही. (Jowar Kharedi)
प्रशासनाच्या अनास्थेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांनी दोन वेळा तहसीलदारांना निवेदन दिलं असूनही कार्यवाही शून्य आहे.(Jowar Kharedi)
गोदाम नाही म्हणून खरेदी नाही!
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या शासकीय हमीभावासाठी संघर्ष करावा लागत आहे.
तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा खरेदी-विक्री संघाकडे स्वतः चे गोदाम नसल्याने शासनमान्य खरेदी केंद्र सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाच्या हमीभाव योजनेचा फायदा शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही.
शेतकऱ्यांचा प्रशासनाला तगादा
यंदा देखील शासकीय ज्वारी खरेदीसाठी परवानगी मिळाल्यानंतरही खरेदी सुरू झालेली नाही. याबाबत सोयगाव खरेदी-विक्री संघाने २ मे रोजी तहसीलदारांना पत्र दिले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे १४ मे रोजी २२१ नोंदणीकृत शेतकऱ्यांनी तहसीलदारांना पुन्हा निवेदन सादर केले.
या निवेदनात प्रशासनाकडून गोदाम उपलब्ध नाही हे कारण पुढे करत शेतकऱ्यांना शासकीय खरेदीपासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप करण्यात आला.
शासनाने आदेश दिलेला असूनही खरेदी केंद्र सुरू न होणे ही तहसील कार्यालयाची जबाबदारी आहे, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
प्रत्येक हंगामात तेच चित्र
तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी शासकीय खरेदीसाठी संघर्ष करावा लागतो. गोदामांची कमतरता, प्रशासनाचा दिरंगाईचा धोरणात्मक दोष आणि यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचा संयम संपत चालला आहे.