संगमनेर : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या उताऱ्यांवरील नोंदी सातबारा अद्ययावत करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार संगमनेर तालुक्यात दोन टप्प्यांत 'जिवंत सातबारा मोहीम' राबविण्यात येत आहे.
अभियान काळात शोध घेतलेल्या एकूण मृत खातेदारांची संख्या २,७४१ इतकी आहे, त्यांपैकी ९०२ वारसांचा सातबारा जिवंत झाला आहे.
अ.पा.क. शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब व्यवस्थापक, तगाई नोंद, बेडिंग/आयकट बोजे, नजरगहाण सावकारी कर्ज, कमी-जास्त पत्रक प्रलंबित नोंदी, पोट खराब वर्ग अ क्षेत्राचे रूपांतर, निकाल साध्या प्रकरणी अर्ज पडताळणी व अंमल, भोगवटादार वर्ग १ व २ स्वतंत्र ७/१२ करणे, निस्तार पत्रकानुसार नोंदी घेणे, महिला वारस नोंदी यांबाबत कामकाज सुरू आहे, असे तहसीलदार धीरज मांजरे यांनी सांगितले.
काय आहे शासनाची 'जिवंत सातबारा मोहीम'◼️ मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनींशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत, यासाठी 'जिवंत सातबारा मोहीम' राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.◼️ या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होत आहेत. तसेच अ.पा.क. शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब व्यवस्थापक, तगाई नोंद, बंडिंग/आयकट बोजे, आर्दीच्या संदर्भान शेतकऱ्यांच्या असलेल्या अडचणींची सोडवणूक करण्यात येत आहे.
महिला वारस नोंद◼️ एखाद्या मृत व्यक्तीच्या मालमत्तेमध्ये वारसा हक्काने महिलेचा हक्क प्रस्थापित करणे म्हणजे महिला वारस नोंद होय. हिंदू वारसा कायदा, १९५६ आणि हिंदू वारसा (दुरुस्ती) कायदा, २००५ अंतर्गत स्त्रीला तिच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलांच्या बरोबरीने समान अधिकार मिळतात.◼️ या नोंदीमुळे महिलेला मालमत्तेत आपला हक्क मिळत असल्याने, संबंधित दस्तऐवजांमध्ये तिचे नाव नोंदवले जाते आणि तिला मालमत्तेवर हक्क मिळतो. जिवंत सातबारा मोहिमे'त आतापर्यंत १३५ महिलांची वारस म्हणून नोंद करण्यात आली.
शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यात येत आहेत. वारसांना त्यांच्या जमिनीवर हक्क मिळण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत. दाखल प्रस्तावांपैकी उर्वरित प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. - धीरज मांजरे, तहसीलदार, संगमनेर
अधिक वाचा: शेतरस्ते होणार आता कायमचे अतिक्रमणमुक्त; प्रत्येक रस्त्यासाठी मिळणार विशिष्ट नंबर