नागपूर : खासगी रुग्णालयांमध्ये सामान्य प्रसूतीसोबतच सिझेरियनचा खर्च सामान्यांचा अवाक्या बाहेर आहे. मात्र, शासकीय रुग्णालयांमध्ये पात्र गर्भवतींच्या मोफत प्रसूतीसोबतच केंद्र सरकारच्या 'जननी सुरक्षा योजने'तून आर्थिक लाभही दिला जातो. मागील ११ महिन्यांत या योजनेतून महिलांना चांगला लाभ झाला आहे.
माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना
दारिद्रय रेषेखालील व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण वाढविणे व माता मृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा उद्देशाने केंद्र सरकारची जननी सुरक्षा योजना आहे. या योजनेअंतर्गत शासकीय आरोग्य संस्थेत प्रसूत झालेल्या महिलांना आर्थिक लाभ दिला जातो.
किती रुपये मिळतात?
• प्रसूती घरी झाली, तर ५०० रुपये
• शहरी भागातील रुग्णालयांमध्ये प्रसूती झाल्यास ६०० रुपये
• ग्रामीण भागातील रुग्णालयांध्ये प्रसुती झाल्यास ७०० रुपये
• सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास १५०० रुपये
अटी व शर्ती काय?
• दारिद्रय रेषेखालील सर्व लाभार्थी
• अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती माता (दारिद्रय रेषेखाली नसलेल्या देखील)
• सदर लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी १९ वर्षे असावे.
• सदर योजनेचा लाभ २ जिवंत अपत्यांपर्यंतच देय राहील.
'डीबीटी'द्वारे थेट खात्यात पैसे
जननी सुरक्षा योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर (एसबीटी) द्वारे थेट पैसे जमा केले जातात. यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींच्या आधार कार्ड हे बँकेशी लिंक्ड असणे आवश्यक आहे.
जननी सुरक्षा योजनेचा अर्ज कुठे करायचा?
• जननी सुरक्षा योजनेचा अर्ज घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन घेऊ शकता किंवा खालीलप्रमाणे ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करू शकता.
• गर्भवती महिलांना ऑनलाईन फॉर्म प्राप्त करण्यासाठी सुरुवातीला योजनेची ऑफिशिअल वेबसाइटमध्ये जाऊनही डाऊनलोड करता येते.
• आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून महिला आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करू शकता.
८ महिन्यांत २,३६९ महिलांना लाभ (महानगरपालिका क्षेत्र)
महिना | संख्या |
एप्रिल | २८ |
मे | १९७ |
जून | ३०४ |
जुलै | ३३७ |
ऑगस्ट | ४५१ |
सप्टेंबर | २६१ |
ऑक्टोबर | ३३४ |
नोव्हेंबर | ४५६ |