Join us

Irrigation: सिंचनासाठी ग्रामस्थ सरसावले; भर उन्हात धरली श्रमदानाची कास वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:35 IST

Irrigation : वाढत्या उन्हाच्या झळा आणि दिवसेंदिवस गडद होत चाललेली पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी सफियाबाद येथील ग्रामस्थांनी 'जलयुक्त शिवार' अभियानांतर्गत एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकत्र येत श्रमदानाची कास धरली आहे.

विजय जाधव वाढत्या उन्हाच्या झळा आणि दिवसेंदिवस गडद होत चाललेली पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी सफियाबाद येथील ग्रामस्थांनी 'जलयुक्त शिवार' अभियानांतर्गत एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकत्र येत श्रमदानाची कास धरली आहे.

उन्हाच्या कडाक्यालाही न जुमानता ग्रामस्थांनी सिंचनाच्या सुविधा सक्षम करण्यासाठी प्रचंड ऊर्जा आणि एकजूट दाखवत गाव शिवारात नाला सरळीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे.

वैजापूर तालुक्यातील सफियाबाद शिवारात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष असून, या भागातील बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. या भागातील विहिरींची पाणी पातळी उन्हाळ्यात कमालीची खालावलेली असते. त्यामुळे पाण्यासाठी शेतकऱ्यांसह मुक्या जनावरांना भटकंती करावी लागते.

सफियाबाद येथील ग्रामस्थ, शेतकऱ्यांची पाण्याची चणचण संपवण्याच्या दृष्टीने डॉ. उज्ज्वल कुमार चव्हाण, मिशन पाचशे पाच पाटील टीम, वारी फाउंडेशन, धामणगाव, ता. चाळीसगाव व मगरपट्टा सिटी टाऊनशिप डेव्हलपमेंट कंपनी, पुणे यांच्या सौजन्याने या भागातील नाल्याचे सरळीकरण आणि रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. 

त्यानुसार २ एप्रिल रोजी नाला खोलीकरण व रुंदीकरण करून नाल्यावर मातीचा बांध तयार करण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर या कामात शेतकरी, ग्रामस्थ, महिला, युवकांनी हिरीरीने सहभाग नोंदवत कामाला सुरुवात केली.

२० ते २२ फूट खोल अन् रुंद, तर ९० ते ९५ फूट लांब नाला

गावातील डॉ. आबासाहेब जाधव यांनी स्वखर्चाने ५५ तास कामासाठी ५५ हजार रुपयांचे डिझेल पोकलेन मशीनसाठी दिले. त्यानंतर येथील नाला २० ते २२ फूट खोल आणि २० ते ९५ मीटर लांब व २० ते २२ मीटर रुंद मातीबांध टाकण्यात आला.

या कामासाठी मिशनचे पाच पाटील, मिलिंद देवकर, श्रीकांत पायगव्हाणे, शेखर निंबाळकर, पंकज पवार, बाबासाहेब राऊत, उपसरपंच अनिल भोसले, दौलतराव जाधव, प्रवीण जाधव यांनी मार्गदर्शन केले.

सध्या उन्हाचा कडाका वाढला असतानाही येथील ग्रामस्थ, शेतकरी आपल्या परिसराच्या सिंचनासाठी पुढाकार घेऊन कामाला लागले आहेत. सध्या हे काम प्रगतिपथावर आहे.

४० ते ४५ विहिरींना होणार लाभ

सफियाबाद शिवारात सुरू असलेल्या नाला खोलीकरण, रुंदीकरण आणि मातीबांधामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलणार आहे.

पावसाचे वाहून जाणारे पाणी आपल्याच शिवारात अडवले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात साधारणतः दीड ते दोन कोटी लिटर पाणीसाठा येथे उपलब्ध होऊ शकतो. परिसरातील आजूबाजूच्या ४० ते ४५ विहिरींना या पाण्याचा फायदा होणार आहे.

५५ तास काम

डॉ. आबासाहेब जाधव यांनी ५५ तास कामासाठी स्वखर्चाने ५५ हजार रुपयांचे डिझेल पोकलेनला दिले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tango Orange: नागपुरी संत्र्याच्या उत्पादकतेचा तिढा; स्पेनच्या टँगोमुळे सुटेल का? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रपाटबंधारे प्रकल्पशेतकरीशेती