Join us

बनावट पीकविमा प्रकरणी तपासणी सुरू; आतापर्यंत ७२५ ठिकाणच्या बोगस फळबागा उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:05 IST

Fruit Crop Insurance : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना मृग बहार सन २०२४ मध्ये विमा भरलेल्या बीड जिल्ह्यातील ३४२३ अर्जदारांच्या क्षेत्रावर जाऊन तपासणी केली जात आहे. तपासणी दरम्यान आतापर्यंत ७२५ ठिकाणी फळबागा नसणे, अधिकचे क्षेत्र दाखवणे, झाडे लहान असणे अशी प्रकरणे समोर आली आहेत.

शिरीष शिंदे

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना मृग बहार सन २०२४ मध्ये विमा भरलेल्या बीड जिल्ह्यातील ३४२३ अर्जदारांच्या क्षेत्रावर जाऊन तपासणी केली जात आहे. तपासणी दरम्यान आतापर्यंत ७२५ ठिकाणी फळबागा नसणे, अधिकचे क्षेत्र दाखवणे, झाडे लहान असणे अशी प्रकरणे समोर आली आहेत.

ही सर्व बोगस प्रकरणे विमा कंपनीने रद्द करावीत, अशी सूचना जिल्हास्तरीय समितीने संबंधित विमा कंपनीला केली आहे. पुढील कालावधीत सुद्धा ही तपासणी सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली; परंतु या गैरप्रकाराला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप २०२४ व पुनर्रचित हवामान आधारित फळपीकविमा योजना मृगबहार २०२४ मधील विमा संरक्षित क्षेत्राची कृषी आयुक्तालयातील पथकामार्फत क्षेत्रीय पडताळणी करण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने १६ ते १८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत बीडसह इतर जिल्ह्यात निवडक तालुक्यात विमा सहभागी शेतकऱ्यांच्या क्षेत्राची पडताळणी करण्यात आली होती.

या तपासणी पथकामध्ये कृषी उपसंचालक, तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक यांचा समावेश होता. पथकामार्फत बीड, जालना, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना व सांगली या जिल्ह्यांमध्ये तपासणी करण्यात आली होती. सदरील मोहिमेत एकूण ३६१ फळबागांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये फक्त १४८ ठिकाणी योग्य फळबाग आढळून आली होती.

१०० टक्के तपासणी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्र तपासणीचे काम आतापर्यंत जवळपास ७० टक्के पूर्ण झाले आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन क्षेत्र तपासणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. १०० टक्के तपासणी केली जाणार आहे.

बीड जिल्ह्यात...

• बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील केरुळ, कडा, धामणगाव, बिरंगुळवाडी या गावांतील ४० ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात फळपीक तपासणी केली असता १८ योग्य अर्ज आढळले होते. ३ ठिकाणी फळपीक बाग आढळली नाही.

• प्रत्यक्षात लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र विमा घेतलेल्या अर्जाची संख्या १६, तर तपासणी वेळी शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या उत्पादनक्षम वयापेक्षा कमी वय आढळलेल्या अर्जाची संख्या ३ आढळली होती. त्यानंतर जिल्हाभरात तपासणी सुरू झाली.

तपासणी राहणार सुरू

• सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४२३ पैकी ७२५ विमा प्रस्ताव हे अपात्र आढळले आहेत. अद्याप १०० टक्के तपासणी झालेली नाही. पुढील कालावधीत विमा काढलेल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन तपासणी केली जाणार आहे.

• सर्व तपासणी झाल्यानंतर हा अहवाल पुढे कृषी आयुक्तालयास पाठविण्यात येणार आहे. बीडसह राज्यात ज्या-ज्या ठिकाणी असे प्रकार प्राधिनिधिक तपासणीत आढळून आले आहेत त्या ठिकाणीही तपासणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : Dragon Fruits Success Story : खर्चाच्या तुलनेत मिळणार दुप्पट उत्पन्न; कृष्णा, भारत घाडगे या सख्ख्या भावांची ड्रॅगनफ्रूट शेती

टॅग्स :पीक विमाशेतकरीशेतीफलोत्पादनबीडमराठवाडासरकार