इस्माईल जहागीरदार
वसमत : यावर्षी झालेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद हे पिके निघाल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात पूर्व हंगामी ऊस लागवड करु लागला आहे. यावर्षी उसाबरोबर हरभरा, कांदा, कोथिंबीर आदी सारखे आंतरपिके घेतली जात आहेत.
आंतरपीक लागवडीमुळे व त्यातून मिळालेल्या उत्पादनातून शेतकऱ्यांचा ऊस लागवडीचा प्राथमिक खर्च निघून जातो. शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी काही प्रमाणात आंतरपिके निघाल्यानंतर आर्थिक मदत होते. तसेच द्विदल आंतरपीक घेतल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे अनेक शेतकरी पूर्व हंगामी उसामध्ये आंतरपीक घेताना दिसत आहेत.
वसमत तालुक्यात इसापूर व सिद्धेश्वर या दोन धरणांचे पाणी मिळत आहे. यंदा दोन्ही धरणांच्या सात सातपाणी पाळ्या शेतकऱ्यांना पिकांसाठी मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.
त्यात आंतरपिकांमध्ये हरभरा व कांदा व गहू आदींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही आंतरपिके कमी कालावधीत निघणारी असल्यामुळे ऊस लागवड होऊन उगवण होईपर्यंत व ऊस मशागतीला येईपर्यंत ही सर्व पिके काढणीला येत असल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
शेतकरी दरवर्षी द्विदल धान्य आंतरपिके म्हणून घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर यावर्षी कांद्याचे वाढलेले भाव पाहता कांदा लागवडीचे क्षेत्र यावर्षीच्या पावसामुळे वाढले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी उसामध्ये आंतरपीक पद्धतीने लागवड करून घेताना दिसत आहेत.
काही भाजीपाला उत्पादक शेतकरी कोथिंबीरचे सुद्धा उत्पादन घेतात. उसामध्ये आंतरपीक घेतल्याचे काही फायदे तर काही तोटे सुद्धा आहेत. उसाला आंतरपीक असलेल्या काळात पाणी जास्त लागते.
सुरुवातीला ऊस लागवड सोबत खताची मात्रा सुद्धा जास्ती वापरावे लागते. उसाला पाण्याच्या नियमित पाळ्या द्याव्या लागतात. या काळात उसामध्ये खुरपणी शिवाय इतर मशागत करता येत नाही. त्यामुळे उसाच्या वाढीवर सुद्धा या आंतरपिकाचा परिणाम होतो.
ऊस लागवडीला जसा उशीर होईल तसेच शेतकरी त्या उसामध्ये आंतरपीक घेत नाहीत. कारण उशिरा लागवड केलेल्या उसासाठी पुन्हा पाण्याची व मशागतीची अडचण होऊ शकते म्हणून सर्वसाधारणपणे पूर्व हंगामी उसात आंतरपिके घेतली जात असल्याचे शेतकरी सांगतात.
दोन धरणांचे पाणी असल्याने पेरा वाढला
यंदा चांगला पाऊस झाल्याने मुबलक पाणी उपलब्ध आहे. तसेच तालुक्यात आंतरपिकांमध्ये हरभरा व कांदा, गहू आदींचा मोठा प्रमाणात समावेश आहे. ही पिके कमी कालावधीत निघणारी आहेत.
त्यामुळे ऊस लागवड होऊन उगवण होईपर्यंत व ऊस मशागतीला येईपर्यंत ही पिके काढणीला येतात. सिद्धेश्वर व इसापूर या दोन्ही धरणांच्या हिवाळी व उन्हाळी सात सात पाणीपाळ्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
आंतरपिकांमुळे शेतकऱ्यांचा खर्च निघतो
सद्यस्थितीत वसमत तालुक्यात उसाचे क्षेत्र अधिक आहे. उसाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागतो. हा खर्च भरुन काढण्यासाठी शेतकरी आंतरपीक घेत असतो. आंतरपिकांमुळे थोडीफार मदत मिळते. - श्रीराम इंगोले, शेतकरी
मागील वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगला झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंतरपीक घेणे सुरु केले आहे. आंतरपिकात भाजीपाला, हरभरा इतर पालेभाज्यांचा समावेश आहे. यामुळे शेती खर्चाला थोडाफार आधार मिळतो. -प्रकाश दळवी, शेतकरी