अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यात गुरांच्या चोरीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र असे असूनही तपासाची प्रक्रिया मात्र ठप्प आहे. विशेषतः इतर जिल्ह्यांमधून मेंढ्या व बकऱ्या चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळांच्या कळपांवर चोरट्यांचा डोळा अधिक आहे.
यात चारचाकी वाहनांचा वापर करून मेंढ्या, बकऱ्या, गायी व बैल चोरून बाजारात विक्री करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. स्थानिक पोलिसांकडून या घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मेंढपाळांनी केला आहे.
गुरांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, तपास लागलेला नसल्याने मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे कठोर तपासाची मागणी केली आहे, जेणेकरून या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवता येईल. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल आहेत.
पाचशे बकऱ्यांतील सहा बोकड गायब
१४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता लाखनवाडा परिसरातील निंबी मालोकार शेतशिवारातून पाचशे बकऱ्यांच्या कळपातील सहा बोकड आणि एक बकरी किंमत ८०,००० रुपये चोरीला गेल्याची फिर्याद सुरेश शिवराम कोकरे (वय ३८, रा. हिवरखेड, ता. खामगाव) यांनी बाळापूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
चार बकऱ्यांची चोरी
१५ जानेवारी रोजी कलकत्ता धाब्याजवळ अज्ञात चोरट्याने बुलढाणा जिल्ह्यातून आलेल्या पट्ट पांडुरंग बिचकुले (वय ३४, रा. वारूळी, ता. मोताळा) यांच्या कळपातील तीन बकऱ्या आणि एक बोकड चोरी केला. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी १६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.
गुरांच्या बाजारात सापडल्या मेंढ्या
चोरीला गेलेल्या काही मेंढ्या डोणगाव येथील गुरांच्या बाजारात सापडल्या असून, विक्री करणाऱ्यांना मेंढ्यांसह बाळापूर पोलिस ठाण्यात आणले आहे. मात्र, संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
पारस फाटा व भिकुंडखेडमध्ये घटना
• ९ ते १० डिसेंबर २०२४ दरम्यान पारस फाटा व पारस मार्गावर फिर्यादी संतोष हनवती हटकर (वय ५५, रा. शिराळा) यांच्या सात मेंढ्या एकूण किंमत १,१०,००० रुपये चोरी झाली. २० जानेवारी २०२५ रोजी त्यांनी बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
• दुसऱ्या घटनेत पट्ट पांडुरंग बिचकुले (वय ३५, रा. वारूळी, ता. मोताळा) यांच्या कळपातील १० मेंढ्या (किंमत १,५०,००० रुपये) १० ऑक्टोबर २०२४ रोजी चोरीला गेल्याचे उघड झाले.
• या प्रकरणी शेख रजीक शेख समद (रा. व्याळा), रजीक अब्दुल रशीद (रा. बाळापूर), गुलजार शेख इस्माईल (रा. बाळापूर) व पुरुषोत्तम म्हैसने (रा. व्याळा) यांच्याविरुद्ध २० जानेवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे.