Join us

शिराळ्यात दीडशे हेक्टरवर चिखलगुठ्ठा पद्धतीने भातशेती.. काय आहे हि पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 11:46 IST

शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे दीडशे हेक्टर शेतीत यंदाच्या पावसाळ्यात चिखलगुष्ठा पद्धतीने भात शेती करण्याचे शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. सध्या जागोजागी या पद्धतीने भात लागवड करण्यास सुरुवात झाली आहे.

पुनवत : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे दीडशे हेक्टर शेतीत यंदाच्या पावसाळ्यात चिखलगुठ्ठा पद्धतीने भातशेती करण्याचे शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. सध्या जागोजागी या पद्धतीने भात लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. या कामात पावसाची चांगली साथ मिळत असल्याने शेत शिवारात शेतकऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे.

शिराळा तालुक्यात पेरणी, टोकण व रोपण पद्धतीने भात शेती केली जाते. विशेषतः चरणपासून चांदोलीपर्यंतच्या भागात अनेक शेतकरी चिखलगुठ्ठा पद्धतीने भातरोपण करण्यास पसंती देतात. तालुक्याच्या उर्वरित भागात भाताची धूळवाफ पेरणी केली जाते.

पश्चिम भागातील तांबडी शेती व पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रोप लागण पद्धतीने पीक चांगले येण्यास मदत होते. प्रतिवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून चिखलगुठ्ठा पद्धतीने भातरोप लागणीचे काम सुरू होते. त्यासाठी अगोदर बैलजोडीच्या किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखलातच शेत नांगरले जाते.

शेतातील तणांचा नायनाट केला जातो व शेतात पाणी साचले की उपलब्ध केलेली भातरोपे शेतात लावली जातात. आठवड्याभरात ही रोपे चांगली जगून येतात व भाताचे पीक सुराला लागते. 

चिखलगुठ्ठाचे फायदे- चिखलगुष्ठा रोपलागण केल्याने शेतकऱ्यांना पुढे फारशी आंतरमशागत करावी लागत नाही.पिकावर जास्त खर्च करावा लागत नाही. या पद्धतीत उत्पन्न जास्त मिळते.यावर्षी तालुक्यातील चांदोली आरळा मणदूर, सुंदलापूर, गुडेपाचगणी परिसर, मेणी खोरा, चरण, पणुंब्रे, या पट्ट्यात चिखलगुट्टा पद्धतीने रोप लागण करण्यास सुरुवात झाली आहे.

शिराळा तालुक्यातील सुमारे दीडशे हेक्टर शेतात चिखलगुठ्ठा रोपलागण होणार आहे. खुंदलापूर गाव परिसरात शंभर टक्के शेतकरी रोपलागण करतात. या शेतीला पश्चिम भागातील वातावरण पोषक ठरत आहे. - अरविंद शिंदे, तालुका कृषी अधिकारी

अधिक वाचा: कापूस पिकातील रसशोषक किडींचा असा करा बंदोबस्त

टॅग्स :भातपीकशेतीखरीपपीक व्यवस्थापनशिराळा