Join us

कोल्हापूर जिल्ह्यात या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार ११.६९ कोटींची दुष्काळी मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 4:14 PM

खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली. नुकसानीचा अंदाज घेत शासनाने हातकणंगले व गडहिंग्लज हे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले.

आयुब मुल्लाखोची: खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली. नुकसानीचा अंदाज घेत शासनाने हातकणंगले व गडहिंग्लज हे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले.

तालुक्यातील ई पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई मिळणार आहे. त्यानुसार हातकणंगले तालुक्यासाठी पाच कोटी ७४ लाख ३९, तर गडहिंग्लज तालुक्यासाठी पाच कोटी ९५ लाख ४४ हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही मदत शेतकऱ्यांना मिळेल.

खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची दखल घेत राज्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यांचा समावेश केला होता.

खरीप हंगामात हातकणंगलेत सरासरीच्या ९० टक्के तर गडहिंग्लजमध्ये ९८ टक्के पेरणी झाली होती. दोन्ही तालुक्यांत अनुक्रमे २० व २८ हजार हेक्टर जिरायत आहे. परंतु, ई पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेक शेतकरी या कृषीविषयक मदतीपासून वंचित राहणार आहेत.

सुमारे तीस टक्के इतक्या पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. कृषी निविष्ठासाठीचे अनुदान म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हेक्टरी ८ हजार ५०० रुपयांप्रमाणे ही मदतीची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हातकणंगले तालुक्यात सोयाबीन, भुईमूग, तूर, मूग, उडीद अशा पिकांचे निकषाप्रमाणे ६ हजार ५२५ हेक्टर क्षेत्र निश्चित झाले. त्यानुसार १७ हजार ३४४ शेतकऱ्यांना पाच कोटी ७४ लाख ३९ हजार रुपयांची मदत मिळणार आहे, तर गडहिंग्लजमध्ये ६ हजार ८६७ हेक्टर इतके क्षेत्र निश्चित होऊन १६ हजार ७२० शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

निविष्ठा खरेदीसाठीच उपयोगशेतकऱ्यांना मिळणाऱ्या या मदतीतून कोणत्याही प्रकारची म्हणजे कर्जवसुली किंवा अन्य कोणतीही वळती करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे निविष्ठा खरेदीसाठीच याचा उपयोग होईल.

टॅग्स :दुष्काळकोल्हापूरशेतकरीहातकणंगलेपीकशेतीपीक कर्जराज्य सरकारखरीप