Join us

ICARच्या फूल संशोधन केंद्राकडून फुलांमध्ये परागीभवन वाढवणारे कीट विकसित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 21:40 IST

जगभरातील ३५ टक्के पिकांचे उत्पादन त्यांच्या परागीभवनावर अवलंबून आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर अधिवास नष्ट होणे आणि फुलांच्या विविधतेत घट यामुळे परागीभवनाचे काम करणाऱ्या जीवांची संख्या कमी झाली आहे.

Pune : कोणत्याही वनस्पतीमधील परागीभवन खूप महत्त्वाचे असते. पिकांच्या उत्पादनामध्ये परागीभवनाचा मोठा वाटा असून हे परागीभवन मधमाशी, फुलपाखरे, कीटक आणि वाऱ्यांच्या माध्यमातून होत असते. पण रासायनिक खतांचा अतिवापर आणि कीटकनाशकांच्या फवारण्या यामुळे परागीभवन करणाऱ्या मधमाशा, कीटक यांचा अधिवास कमी होताना दिसत आहे. यावर मात करण्यासाठी आईसीएआरच्या पुष्प विज्ञान संशोधन संचालनालयाकडून 'परागणक अधिवास पुनर्स्थापन किट' विकसित करण्यात आली आहे.

जगभरातील ३५ टक्के पिकांचे उत्पादन त्यांच्या परागीभवनावर अवलंबून आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर अधिवास नष्ट होणे आणि फुलांच्या विविधतेत घट यामुळे परागीभवनाचे काम करणाऱ्या जीवांची संख्या कमी झाली आहे. या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या कीटमध्ये फुलझाडांची उपलब्धता वाढवून परागीभवनाचे काम करणाऱ्या कीटकांना योग्य अधिवास तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.

सजावटींच्या फुलांचा रंग, सुगंध, मधुरस आणि परागामुळे त्याकडे मधमाशा, कीटक आकर्षित होतात. त्याअनुषंगाने या कीटसाठी ग्रीष्म, पावसाळा आणि हिवाळा या हंगामात फुलणाऱ्या ६०० हून अधिक फुलांच्या जातीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. या कीटमध्ये मधमाशा, माशा, भुंगे, फुलपाखरे, पतंग यांसारख्या १५३ हून अधिक कीटकांना आकर्षित करण्याची क्षमता तपासण्यात आली. हंगामानुसार मधुरस व परागाच्या उपलब्धतेविषयीचे वैज्ञानिक आकडे संकलित करून एक सविस्तर डेटाबेस तयार करण्यात आला आणि त्याच्या आधारे ही किट डिझाईन करण्यात आली आहे.

कोणत्या पिकांना होणार फायदा?ही किट कांदा, वेलवर्गीय पिके, डाळिंब, सीताफळ, आंबा यांसारख्या पिकांसाठी फायदेशीर आहे. शिवाय, मधमाशीपालकांसाठीही उपयुक्त ठरते, कारण ती मधमाश्यांचे आरोग्य सुधारते आणि मध, मेण व अन्य उत्पादनांचे शाश्वत उत्पादन वाढवते.

फळबागांसाठी आणि शेतातील पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी विशेषतः या कीटचा उपयोग होणार आहे. तर ही कीट पुणे येथील आईसीएआरच्या पुष्प विज्ञान संशोधन केंद्रामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. मोठ्या क्षेत्रासाठी किंवा वैयक्तिक एका शेतकऱ्यालाही ही कीट खरेदी करता येणार आहे.

- डॉ. डी.एम. फिरके (वरिष्ठ शास्त्रज्ञ, आईसीएआर-पुष्प विज्ञान संशोधन संचालनालय, पुणे)dfrseeds@gmail.com

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणेफुलं