Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात संतुलित खत वापराबाबत ICAR-DFR ची जनजागृती मोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 14:49 IST

या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका (Soil Health Cards) वितरित करण्यात आल्या, ज्यामुळे वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारे पोषणद्रव्यांच्या वापराबाबत योग्य निर्णय घेण्यास त्यांना मदत होईल.

Pune : भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या “संतुलित खतांच्या वापराबाबत तीव्र जनजागृती मोहीम” अंतर्गत, ICAR–फुलशेती संशोधन संचालनालय, पुणे येथील शास्त्रज्ञांनी पुणे जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये शेतकरी जनजागृती कार्यक्रमांची मालिका सुरू केली आहे.

या मोहिमेअंतर्गत ९ एप्रिल रोजी हवेली तालुक्यातील निरगुडी गावात शास्त्रज्ञांच्या पथकाने जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. यावेळी शेतकऱ्यांना संतुलित खतांच्या वापराचे महत्त्व तसेच शाश्वत शेती पद्धतींची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मृदा आरोग्य सुधारण्यासाठी माती परिक्षणावर आधारित खतांच्या शिफारसींचा अवलंब करण्यावर विशेष भर देण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका (Soil Health Cards) वितरित करण्यात आल्या, ज्यामुळे वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारे पोषणद्रव्यांच्या वापराबाबत योग्य निर्णय घेण्यास त्यांना मदत होईल. डॉ. गिरीश के. एस., डॉ. अरविंद वर्मा, डॉ. संजय कड, डॉ. एम.डी. बसीत रझा आणि डॉ. वरुण हिरेमठ यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ पथकाने अति व असंतुलित खत वापराचे दुष्परिणाम अधोरेखित केले. तसेच, दीर्घकालीन शाश्वत शेतीसाठी जैव-इनपुट्सचा वापर व सेंद्रिय स्रोतांचे पुनर्वापर यांसह एकात्मिक पोषण व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

ICAR-DFR पुढील काही आठवड्यांत हवेली, मावळ आणि जुन्नर तालुक्यांमध्ये ही मोहीम विस्तारित करण्याची योजना आखत आहे. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करणे आणि पर्यावरणपूरक तसेच आर्थिकदृष्ट्या शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ही मोहीम पुणे जिल्ह्यातील मृदा आरोग्य सुधारणा आणि शाश्वत कृषी विकासाला बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : ICAR-DFR Pune Launches Awareness Campaign on Balanced Fertilizer Use

Web Summary : ICAR-DFR Pune initiates awareness campaign on balanced fertilizer use in Pune district. Farmers are educated on soil health, sustainable practices, and integrated nutrient management. Soil Health Cards distributed.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणे