सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये निसर्गाच्या कुशीत, अहिल्यानगर जिल्ह्याची भाग्यरेषा असलेल्या प्रवरा नदीवर बांधलेले धरण म्हणजे भंडारदरा. या धरणाची जीवनगाथा इतिहास अभ्यासक विकास मुरलीधर पवार (राजूरकर) यांनी पुस्तक रूपाने समोर आणली.
ती थेट इंग्लंडचे राजे प्रिन्स चार्ल्स तिसरे यांच्यापर्यंत पोहोचली. त्याची दखल घेत त्यांनीही पवार यांचे कौतुक केले. हा सगळा प्रवास कसा झाला याबाबत जाणून घेऊ या..
राजूर येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळ संचालित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, देवठाण येथील इतिहास अभ्यासक विकास मुरलीधर पवार (राजूरकर) यांचे 'भंडारदरा धरण-शतकपूर्ती प्रवास' हे ई-बुक २६ ऑगस्ट २०२० रोजी ई-साहित्य प्रतिष्ठान, ठाणे यांच्यामार्फत प्रकाशित झाले.
ब्रिटिश राजवटीत १९१० मध्ये भंडारदरा धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली. ते १९२६ मध्ये पूर्ण झाले. धरण निर्मितीच्या या कहाणीत बांधकामपूर्व सर्वेक्षणापासून तत्कालीन गव्हर्नरांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनापर्यंतचा इतिहास पुस्तकात सांगितला आहे.
धरण बांधकामापूर्वी येथे झालेली सिंचनविषयक कामे, धरण सर्वेक्षणासाठी तत्कालीन अभियंत्यांनी केलेले प्रयत्न आदींची माहितीही दिली आहे. त्यावेळचा दुष्काळ, अकोले तालुक्यातील क्रांतिकारकांनी दिलेले लढे, डेक्कन रॉयट्स कमिशन अशा विविध विषयांना लेखक पवार यांनी स्पर्श केला आहे.
ब्रिटिशांनी या परिसरात बांधलेले रस्ते, पूल, इमारती, विश्रामगृहांची माहितीही यात आहे. धरणामुळे लाभक्षेत्रात झालेले परिवर्तन, सहकार चळवळीचा झालेला उदय आदींचाही उल्लेख करण्यात आला आहे.
पुस्तकाचे एक वेगळेपण म्हणजे धरणाचे बांधकाम सुरू असताना काढलेली छायाचित्रे, बांधकामाच्या सुरुवातीपासून सुमारे ९० पेक्षा अधिक छायाचित्रांनी धरण बांधकामाचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो.
इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ-२ यांच्यापर्यंत पुस्तक पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू होता; मात्र, ८ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. दरवर्षी १० डिसेंबर रोजी शेंडी येथील भंडारदरा धरणप्रेमी मंडळ धरणाचा वाढदिवस, म्हणजेच कृतज्ञता दिन साजरा करतात.
१० डिसेंबर २०१७ म्हणजेच ९१ व्या वाढदिवसापासून हा उपक्रम सुरू झाला. इंग्लंडचे राजे चार्ल्स-तिसरे यांनी ६ सप्टेंबर २०२४ रोजी आभाराचे पत्र पाठवले.
त्यात त्यांनी पुस्तक मिळाल्याचे, ते आवडल्याचे पत्राद्वारे कळविले. राजांचे हे पत्र स्वतः आदित्य पानसे यांनी लंडनहून थेट भंडारदरा, शेंडी येथे सुखरूप पोहोचविले.
या पत्रात त्यांनी पुस्तकाचे कौतुक केले आहे. एखाद्या धरणाच्या सुरुवातीपासून सद्य:स्थितीपर्यंतचा इतिहास मांडणारे हे एकमेव पुस्तक आहे.
या विक्रमांची जागतिक स्तरावर 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद आहे. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी 'भंडारदरा धरण-शतकपूर्ती प्रवास' या विकास पवार यांनी लिहिलेल्या ग्रंथास लोणीतील विखे फाउंडेशनतर्फे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जिल्हा विशेष साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले.- ललितकुमार नारायण छल्लारे
अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार; आता राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना, काय आहे नेमका उद्देश?
Web Summary : Historian Vikas Pawar's book on Bhandardara Dam's history reached King Charles III, who praised it. The book covers the dam's construction from 1910-1926, its impact, and includes rare photographs. It received awards and recognition, including from the Limca Book of Records.
Web Summary : इतिहासकार विकास पवार की भंडारदरा बांध के इतिहास पर लिखी पुस्तक राजा चार्ल्स तृतीय तक पहुंची, जिन्होंने इसकी सराहना की। पुस्तक में 1910-1926 तक बांध के निर्माण, इसके प्रभाव को शामिल किया गया है और इसमें दुर्लभ तस्वीरें हैं। इसे लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स सहित पुरस्कार और मान्यता मिली।