Join us

रात्रीच्या गारठ्यामुळे हापूसचा मोहोर बहरण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2023 11:01 IST

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून थंडी पडू लागल्याने आंबा हंगामासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. दिवसा कडकडीत ऊन पडत असले तरी रात्रीपासून सकाळपर्यंत गारठा असल्याने मोहोर प्रक्रिया सुरू होण्यास फायदा होणार असल्याचा अंदाज आंबा बागायतदारांनी वर्तविला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून थंडी पडू लागल्याने आंबा हंगामासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. दिवसा कडकडीत ऊन पडत असले तरी रात्रीपासून सकाळपर्यंत गारठा असल्याने मोहोर प्रक्रिया सुरू होण्यास फायदा होणार असल्याचा अंदाज आंबा बागायतदारांनी वर्तविला आहे.

यावर्षी उन्हाचा कडाका नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत होता. त्यामुळे थंडीचे प्रमाण खूपच कमी होते, थंडीचा हंगाम असूनही थंडी गायब होती त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बागायतदारांची चिंता वाढली होती. तुडतुडा, कीड, बुरशीजन्य रोगासह थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे मोहर व मोहराला झालेली फळधारणा वाचविण्यासाठी बागायतदारांना कसरत करावी लागली.

मात्र, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून वातावरणात बदल होऊन थंडीची चाहूल लागू लागली आहे. सध्या किमान तापमान २६ अंश सेल्सियस व कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस इतके आहे. गेले दोन दिवस थंडीचे प्रमाण वाढल्याने वागायतदारांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षी हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे आंबा पीक जेमतेम १५ ते २० टक्केच होते. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी घेतलेला खर्चही निघाला नसल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला, यावर्षी तरी आंबा फायदेशीर ठरण्याची आशा व्यक्त होत आहे.

- गेली पंधरा वर्षे सातत्याने हवामानातील बदलाचा खूप मोठा फटका आंबा आणि काजूच्या पिकाला बसत आहे.- मोठे आर्थिक नुकसान होत असतानाही त्यातून मार्ग काढण्याकडे अजून गांभीर्याने पाहण्यात आलेले नाही.

बागायतदारांना दिलासारत्नागिरी जिल्ह्यात हळूहळू थंडींची चाहूल लागली असून, आंधा हंगामासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. त्यामुळे आंब्यावर मोहोर प्रक्रिया सुरू झाल्याने आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्याचे अर्थार्जन आंबा पिकावर अवलंबून आहे. हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे आंबा पिक धोक्यात येत असते, आता थंडी पडू लागली असून, मोहर प्रक्रियेला पोषक वातावरण तयार होत आहे. हे असेच वातावरण राहिल्यास मोहोर चांगला येऊन पीकही चांगले येईल. - राजन कदम, आंबा बागायतदार

टॅग्स :आंबारत्नागिरीशेतकरीपीकतापमानहवामान