Join us

अतिवृष्टीमुळे कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला; 'या' करा उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 14:50 IST

अतिवृष्टीमुळे कापसावर आकस्मिक मर (पॅरा विल्ट) हा रोग दिसून येत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे कापसावर आकस्मिक मर (पॅरा विल्ट) हा रोग दिसून येत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.

जिल्ह्यात ३०,२२३ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. १ व २ सप्टेंबर रोजी सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके हातची गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पावसाच्या तडाख्यातून काही ठिकाणी कापूस पीक बचावेल, असे वाटत होते. आता या पिकावरही अतिवृष्टीमुळे आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

आकस्मिक मर ही विकृती पीक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेले असताना अधिक प्रमाणात दिसून येते. पावसाच्या मोठ्या खंडामुळे कपाशी पिकास पावसाचा ताण बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेले जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर या विकृतीचा कापूस पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कापसावर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

...अशी करा उपाययोजना

• अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे. आकस्मिक मर या विकृतीचे लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी आळवणी करावी.

• कॉपर ऑक्सिक्लोराइड (२५ ग्रॅम) किंवा कार्बेनडाझीम (१० ग्रॅम) युरिया (२०० ग्रॅम) / १० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण करून प्रतिझाडास २५०-५०० मिली द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी करावी. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २ टक्के डीएपी (२०० ग्रॅम/१० लि. पाणी) याची आळवणी करून लगेच हलके पाणी द्यावे, असे आवाहन कृषितज्ज्ञांनी केले आहे.

कापसाचे पाती, फुले व बोंडे गळतात

• आकस्मिक मर या रोगामुळे कापसाच्या झाडातील तेजपणा नाहीसा होऊन झाड एकदम मलूल तथा सुकल्यासारखे दिसते.

• प्रादुर्भावग्रस्त कापसाची पाने, फुले खालच्या दिशेने वाकतात किंवा पिवळे पडतात. पाती, फुले व अपरिपक्व बोंडे सुकून गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मुळे कुजत नाहीत.

टॅग्स :कापूसशेतकरीशेतीशेती क्षेत्रहिंगोलीपाऊसपीक व्यवस्थापन