Join us
Daily Top 2Weekly Top 5

Heavy Rain : नांदेड, हिंगोलीत ४९ मंडळांत अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:04 IST

उर्वरित मराठवाड्यातील पिके अद्याप ऑक्सिजनवर; पण ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

मोठ्या खंडानंतर पावसाने हजेरी लावली. नांदेड, हिंगोलीतील ४९ मंडळांत अतिवृष्टी झाली, पिकांना जीवदान मिळाले. संभाजीनगरातील काही भागांत संततधार बरसला. मात्र उर्वरित मराठवाडचात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने शेती पिके ऑक्सिजनवरच आहेत. दरम्यान, ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात.

नांदेड जिल्हा : ३९ मंडळांत अतिवृष्टी, पिकांना संजीवनीजिल्ह्यात सलग दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर जोरदार हजेरी लावली आहे. बुधवार सायंकाळपासून जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून, तब्बल ३९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता रखडलेल्या पेरण्यांना गती घेतील.

पावसाअभावी बियाण्याची उगवण क्षमता घटली होती. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंगावत होते. अशातच बुधवारी रात्री नांदेड, लोहा, भोकर, देगलूर, किनवट, हदगाव, अर्धापूरसह सोळाही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळाले.

हिंगोली : १० मंडळांत अतिवृष्टी, बळीराजा सुखावलाया वर्षीच्या पावसाळ्यात बुधवारी रात्री पहिलाच दमदार पाऊस बरसला असून, प्रथमच दहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. या पावसाने बळीराजा सुखावला आहे. मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने यंदा पावसाळा चांगला राहील, अशी आशा होती. मात्र मृग नक्षत्रात पावसाने दडी मारली. अल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता होती. मात्र, बुधवारी रात्री पावसाचे दमदार आगमन झाले. जिल्हाभरात रात्रभर भिज पाऊस झाला. २४ तासांमध्ये १० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद होती.

परभणी जिल्हा : सर्वदूर झाला भीज पाऊसशहर परिसरात बुधवारी रात्री दोन ते तीन तास दमदार पाऊस झाला, तर जिल्हाभरात सर्वत्र गुरुवारी दुपारपर्यंत भीज पाऊस सुरू होता. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. परभणी शहरात बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. रात्री एक ते दीड वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला. गुरुवारीही रिपरिप सुरूच होती. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण १९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

लातूर जिल्हा : ढगाळ वातावरणाने आशामृगाच्या प्रारंभी वरुणराजाच्या हजेरीने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, त्यानंतर अद्यापही पाऊस गायब झाला आहे. गुरुवारी वातावरणात बदल होऊन सतत ढग येत असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात २४ तासांत ४.१ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ६.४८ लाख हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यत जिल्ह्यात ४.३८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७२.६ मिमी पाऊस झाला आहे.

धाराशिव जिल्हा : वारे थांबल्याने पावसाची ओढदोन आठवड्यांपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मात्र, गुरुवारी वारे थांबून पावसाचा शिडकावा झाल्याने शेतकऱ्यांना आशा निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात मे महिन्यात २९८ मिमी, पण, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ ९६ मिमी पाऊस झाला. शेतकऱ्यांनी ७० टक्क्यांहून अधिक पेरण्या उरकून घेतल्या. दरम्यान, गुरुवारी पावसाचा हलकासा शिडकावा झाला. शिवाय, वेगाने वाहणारे वारेही थांबले. यामुळे आता पाऊस येईल व पिके वाचतील, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा : सिल्लोड, सोयगावात नद्यांना पूरछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी दुपारपासून पाऊस सुरू झाला असून, गुरुवारीही विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला. सोयगावातील काळदरीच्या अग्नावती नदीला पूर आला. तसेच काळदरीचे धरणही ओव्हर फ्लो झाले. सिल्लोडमध्ये परिसरातही पावसाने दिवसभर हजेरी लावली होती.

जालना जिल्हा : पावसाची संततधारजालना जिल्ह्याच्या विविध भागांत बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर संततधार पाऊस झाला. त्यामुळे कोमेजलेल्या पिकांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात ६० टक्के पेरणी झाली आहे. परंतु, पावसाअभावी पिके माना टाकत होते. गुरुवारी सकाळपूर्वी २४ तासात २२.८० मिमी पाऊस झाला. जाफराबादेत ५१.२०, तर घनसावंगीत ७.२० मिमी, तर भोकरदनमधील धावडा, आन्वा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

टॅग्स :पाऊसशेतकरीशेती क्षेत्र