Join us

गुजरातचा २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा होणार निर्यात; निर्यातीला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 7:00 PM

महाराष्ट्राचे कांदा उत्पादक शेतकरी मात्र निर्यातबंदीमुळे अध्याप ही नाराज

एकीकडे कांद्याचा प्रश्न बिकट होत असताना, शेतकरी सातत्याने निर्यात खुली करण्याची मागणी करत आहे. यातच आता  केंद्र सरकारच्या माध्यमातुन गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची २००० मेट्रिक टननिर्यातीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातीलकांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या आठ डिसेंबर पासून कांद्याची निर्यातबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात कांद्याचे दर कोसळले शिवाय तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करत कांदा विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकरी, शेतकरी संघटना आदींच्या माध्यमातून कांदा निर्यात खुली करण्यासाठी आंदोलने देखील करण्यात आली.

मात्र अद्यापही यावर तोडगा निघू शकलेला नाही. अशा स्थितीत केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीसाठी परवानगी दिल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे.  

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने याबाबतचे परिपत्रक काढले असून यानुसार २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात केला जाणार आहे. गुजरात राज्यातील मुंद्रा पोर्ट, पिपापाव पोर्ट आणि नाव्हाशेव्हा/ जेएनपीटी पोर्टवरून निर्यात केली जाणार आहे. विशेष म्हणजे एनसीएल च्या माध्यमातून निर्यात न करता थेट निर्यातदारांच्या माध्यमातून हि निर्यात केली जाणार आहे.

यावर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले की, एकीकडे लाल आणि उन्हाळ कांदा कवडीमोल भावात विकला जात आहे, गेल्या अनेक दिवसांपासूनची असलेली निर्यात खुली करण्याच्या मागणीवर  शासन अद्यापही उदासीन आहे.

दुसरीकडे अचानकपणे गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय असून शासनाचे हे धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मातीत घेऊन जात असल्याचे सांगत त्यांनी रोष व्यक्त केला.

टॅग्स :कांदामहाराष्ट्रगुजरातशेतकरीशेती