Join us

कृषी विभागाची मार्गदर्शक तत्वे; या प्रकारे ओळखा बोगस बियाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 3:19 PM

कृषी विभागही 'अलर्ट मोड'वर

खरीप हंगाम एका महिन्यावर येऊन ठेपला असून, यंदा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अनधिकृत, बोगस बियाण्यांची एन्ट्री होऊ नये म्हणून कृषी विभागाची सात भरारी पथकेही सतर्क झाली. शेतकऱ्यांनी अनधिकृत, बोगस बियाणे कसे ओळखावे? याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे.

रब्बी हंगाम संपल्यानंतर प्रशासनासह बहुतांश शेतकरीदेखील लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याचे दिसून आले. २६ एप्रिल रोजी मतदान आटोपल्यानंतर जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाने देखील 'अलर्ट मोड'वर येत खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू केली. शेतकरीदेखीलशेती मशागतीच्या कामांकडे वळले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामात चार लाखापेक्षा अधिक हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. जिल्हा हा सोयाबीन बेल्ट असल्याने यंदाही खरीप हंगामात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी अर्थात ३ लाख ७ हजार हेक्टरवर होणार आहे.

खरीप हंगाम जवळ येत असल्याने बी- बियाणे, कीटकनाशके विक्री करण्यासाठी विविध कंपन्यादेखील सरसावल्याचे दिसून येते. सोयाबीन, कपाशी तर यांसह अन्य पिकांचे अनधिकृत, बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यासाठी अमरावती विभागात काही कंपन्यांचे एजंट सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनधिकृत बोगस बियाण्यांचा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये म्हणून कृषी विभागाची सात भरारी पथके अलर्ट झाली.

जिल्ह्यात सोयाबीनचे पुरेसे बियाणे उपलब्ध असल्याने फसवणुकीची शक्यता कमीच आहे. परंतु कपाशीच्या बियाण्यांची टंचाई लक्षात घेता अन्य जिल्हा किंवा राज्यातून अनधिकृत, बोगस बियाणे जिल्ह्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी अधिकृत प्रमाणित बियाणेच खरेदी करावे, असे आवाहन कषी विभागाने केले.

असे ओळखा बोगस बियाणे

शासनाचा उत्पादन अथवा विक्री परवाना नसणे, बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडून प्रमाणित नसलेले बियाणे, तपासणी केल्याचा रिपोर्ट नसल्यास बियाणे अनधिकृत किंवा बोगस असल्याचे मानले जाते. बोगस बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली याचा उल्लेख नसतो. पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण नसते.

काळजी काय घ्यावी?

अधिकृत परवानाधारक कृषी विक्रेत्यांकडून बियाणे, खते खरेदी करावी. खरेदीवेळी न चुकता पक्के बिल घ्यावे. देयकात पीक, वाण प्लॉट क्रमांक, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे नाव संपूर्ण नमूद असावे. कृषी केंद्रधारकाने पक्के बिल संपूर्ण विवरणासह न दिल्यास नजीकच्या कृषी विभागाकडे संपर्क साधावा.

सोयाबीनचे ६६ हजार ८३२ क्विंटलची बियाणे मागणी नोंदविण्यात आली. उर्वरीत लागणारे बियाणे शेतकऱ्यांकडे घरगुती पध्दतीने जतन करण्यात आलेले आहे. वाशिम जिल्ह्यात अनधिकृत बियाण्यांचा शिरकाव होणार नाही याची दक्षता म्हणून सात भरारी पथके सक्रिय ठेवण्यात आली. - गणेश गिरी कृषी विकास अधिकारी, जि.प. वाशिम

हेही वाचा - निंबोळी अर्काच्या वापरामुळे वाचतो २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च

टॅग्स :शेतीशेतकरीपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रविदर्भअकोला