Join us

शेतीतील जोखीम कमी करणार गटशेतीचा मार्ग; विकसित कृषि संकल्प अभियानाच्या समारोप कार्यक्रमात शास्त्रज्ञांचे मत

By रविंद्र जाधव | Updated: June 12, 2025 19:38 IST

शेती ही आता फक्त पारंपरिक पद्धतीने न चालवता आधुनिक शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी समूहाने शेती (गटशेती) करणे ही काळाची गरज आहे असे स्पष्ट मत कृषी शास्त्रज्ञांनी ‘विकसित कृषि संकल्प अभियान’च्या समारोप कार्यक्रमात मांडले. (KVK Sagroli)

शेती ही आता फक्त पारंपरिक पद्धतीने न चालवता आधुनिक शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी समूहाने शेती (गटशेती) करणे ही काळाची गरज आहे असे स्पष्ट मत कृषी शास्त्रज्ञांनी ‘विकसित कृषि संकल्प अभियान’च्या समारोप कार्यक्रमात मांडले.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली व उमरी तालुक्यातील विविध गावांमध्ये हा समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध गावांतील शेतकरी, कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या अभियानात शेतकऱ्यांनी गटशेतीच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर “गटशेतीद्वारे एकत्र येऊन काम केल्यास आधुनिक यंत्रसामग्रीचा सामूहिक वापर शक्य होतो, उत्पादन खर्चात बचत होते, विक्रीसाठी बाजारपेठेवर नियंत्रण मिळते, आणि एकत्रित निर्णयप्रक्रियेने शेती अधिक शास्त्रशुद्ध होते,” असे मत शास्त्रज्ञांनी मांडले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शिरगुरे, शास्त्रज्ञ डमाळे, ऊस संशोधन संस्था प्रवरानगरचे डॉ. थोरात व डॉ. बोरसे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. कपिल इंगळे व डॉ. प्रियंका खोले, वेंकट शिंदे तसेच प्रशांत शिवपणोर, बालाजी चांदापुरे, प्रभुदास उडतेवार आणि संतोष लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृषि विज्ञान केंद्राने बजावली विशेष कामगिरी

• २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत देशभरात ‘विकसित कृषि संकल्प अभियान’ राबविण्यात आले. नांदेड जिल्ह्यात संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी याने यामध्ये विशेष कामगिरी बजावली. या कालावधीत आठ तालुक्यांतील ९० गावांमध्ये प्रत्यक्ष शिवार भेटी देण्यात आल्या.

• तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, संतुलित खत वापर, मृदा आरोग्य व्यवस्थापन, पीक संरक्षण, कृषीविषयक शासकीय योजना यांची माहिती देण्यात आली. चर्चासत्रे, प्रात्यक्षिके व सल्ला शिबिरे आयोजित करण्यात आली.

FPO व NABARD सहकार्याची माहिती

या कार्यक्रम दरम्यान कृषी विभागाचे अधिकारी कांबळे यांनी FPO (Farmer Producer Organization) या योजनेतील अनुदानाच्या तरतुदी तसेच NABARD कडून मिळणाऱ्या सहकार्याची माहिती दिली. ज्यात त्यांनी सांगितले की FPO स्थापन करून शेतकरी आपल्या उत्पादनांची एकत्र विक्री, प्रक्रिया, ब्रँडिंग व मार्केटिंग करू शकतात ज्यामुळे शेतीतील नफा वाढवता येतो.

हेही वाचा : ताडकळस येथील २२ वर्षीय पदवीधर तरुणाने भाजीपाला उत्पादनातून मिळविले नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीनांदेडनांदेडमराठवाडा