खामगाव : जिल्ह्यात तेलबियांचे क्षेत्र कमी होत असताना काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची (Bhuimug) पेरणी केली आहे. परंतु, या पिकावर वायर वर्म, फुलकिडे आणि तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
'वायर वर्म' (Wire Worm) ही जमिनीत आढळणारी शेंगा पोखरणारी कीड आहे. ती मुख्यतः जमिनीत कुजलेल्या पिकांचे अवशेष आणि पालापाचोळ्याचे खाद्य घेत असते.
भुईमुगाच्या शेंगांवर ही कीड अळीच्या रूपात आढळते. ती शेंगांना छिद्र करते त्यामुळे ओलिताचे पाणी त्यात शिरते आणि पीकास बुरशीचा प्रादुर्भाव होतो, शेंगांतील दाणे सडतात. त्यामुळे उत्पादनावर वाईट परिणाम होतो, असे कृषी विज्ञान केंद्रातील कृषितज्ज्ञांनी सांगितले. किडींच्या प्रादुर्भावाची तपासणी कशी करावी?
प्रादुर्भावाची सुरुवात पिकाच्या ६० ते ७० दिवसांच्या अवस्थेत होते. यावेळी शेतकऱ्यांनी किमान एक झाड उपटून किडीचा तपास करावा, त्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना कराव्या, असे जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्रातील (KVK) शास्त्रज्ञांनी उत्पादक शेतकऱ्यांना सुचवले आहे.
वायर वर्म नियंत्रणाचे उपाय
किडीचे नियंत्रण करण्यासाठी, भरीच्या डवरणीच्या फेरीपूर्वी (पेरणीपासून ४५ ते ५० दिवसांनी) कार्बोफुरॉन ३ टक्के दाणेदार कीटकनाशक, हेक्टरी ५० किलो कुजलेले शेणखत किंवा मातीत मिसळून द्यावे. त्यामुळे वायर वर्म किडीचा प्रादुर्भाव कमी होईल, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Unhali Bhuimug : उन्हाळी भुईमुगाची लागवड करताय? कोणत्या जाती निवडाल?