Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kapus Biyane Vikri : सरकारकडून कापूस बियाणे विक्री व पुरवठ्याबाबत वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 17:35 IST

Kapus Biyane Vikri : राज्य शासनाने कापूस बियाणे विक्री व पुरवठ्याबाबत महत्त्वाचे नियोजन जाहीर केले आहे. 

जळगाव : खरीप हंगाम २०२६ मध्ये कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने बीटी कापूस बियाणे विक्री व पुरवठ्याबाबत महत्त्वाचे नियोजन जाहीर केले आहे. 

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने कृषी आयुक्तालयाला यासंदर्भात निर्देश पाठवले असून, त्यानुसार जिल्ह्यातील सर्व परवानाधारक विक्रेत्यांना १५ मेपासून शेतकऱ्यांना बीटी कापसाचे बियाणे विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षात गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात लागवड नियोजनबद्ध पद्धतीने व्हावी आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी शासनाने बियाणे पुरवठा आणि विक्रीसाठी निश्चित वेळापत्रक आखले आहे.

बियाणे पुरवठ्याचे टप्पे निश्चित
शासनाच्या निर्देशानुसार, बीटी कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांनी १० मेपर्यंत वितरकांकडे बियाण्यांचा पुरवठा पूर्ण करायचा होता. त्यानंतर वितरकांनी किरकोळ विक्रेत्यांकडे बियाणे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यानुसार १५ मेपासून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विक्री सुरू होणार आहे. 

कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व अधिकृत विक्रेते, वितरक आणि कृषी सेवा केंद्रांना शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, तसेच जादा दराने विक्री होऊ नये यासाठी देखील प्रशासन सतर्क राहणार असल्याचे सांगण्यात आले.

१ जूननंतरच लागवडीचा सल्ला
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना १ जूननंतरच कापूस लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. वेळेपूर्वी लागवड केल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे हवामान, पावसाची स्थिती आणि कीड व्यवस्थापन लक्षात घेऊन लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण कसे करावे, प्रक्रिया काय असते? दोन मिनिटांत करा केवायसी

 

English
हिंदी सारांश
Web Title : Cotton Seed Sale: Schedule Announced by Government for Sale and Supply

Web Summary : To curb pink bollworm, Maharashtra announces BT cotton seed sale from May 15. Distribution deadlines are set, and farmers are advised to plant after June 1. Authorities will monitor seed availability and pricing.
टॅग्स :शेती क्षेत्रकापूसमार्केट यार्डशेतकरी