Join us

शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगली; ग्रामीण डाक जीवन विमा योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 10:14 AM

या योजनेत कमीतकमी हप्ता व जास्तीत जास्त लाभ

भारतीय टपाल विभागाच्या जीवन विमा योजनेतून विमाकवच घेतलेल्या दोन मृतांच्या वारसांना एकूण १९ लाख १५ हजार ५०० रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तहसील कार्यालयात कार्यरत कर्मचारी अजिनाथ मधुकर बांदल यांचा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी आजाराने मृत्यू झाला. त्यांनी ११ जानेवारी २०२१ रोजी १० लाख रुपयांची टपाल जीवन विमा पॉलिसी घेतली होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी वंदना अजिनाथ बांदल यांना टपाल जीवन विमा योजनेतून १० लाख ६५ हजार १०० रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.

तसेच अनिल लक्ष्मण धस यांच्या नावे असलेल्या पाच लाखांच्या पॉलिसीची रक्कम मृत्यूपश्चात त्यांच्या वारस पत्नी विजयालक्ष्मी अनिल धस यांना ८ लाख ५० हजार ४०० रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.

दोन्ही धनादेश बीडचे डाक अधीक्षक डी. आर. शिवनीकर यांच्या हस्ते प्रधान डाकघर बीड येथे प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रधान डाकघरचे पोस्टमास्तर हेमंत पानखडे टपाल जीवन विमा विकास अधिकारी बाबासाहेब मोरे, सोमनाथ खोड, सीपीसीपीए अमोल निर्मळ, अमरसिंग ढाका, शिवाजी नवले, व्ही. के. वीर व पोस्टाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोस्टाच्या जीवन विमा योजनेची माहिती व त्याचे महत्त्व सांगण्यात आले.

पोस्टाची विमा योजना सर्वाधिक सुरक्षित

डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा योजना कर्मचारी, शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगली आहे. या योजनेत कमीतकमी हप्ता व जास्तीत जास्त लाभ मिळतो. ग्रामीण भागातील व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, लघुउद्योजक आदींना दहा लाखांचा, तर कर्मचारी, डॉक्टर, इंजिनियर, डिप्लोमाधारक, पदवीधारकांना ५० लाखांपर्यंत विमा घेता येतो.

आयकर सवलत, कर्जाची सोय, वारसाचे नाव नोंदवण्याची सोय, भारतात कुठेही पोस्ट ऑफिसमध्ये प्रीमियम जमा करता येतो. त्यासाठी ऑनलाइनची सुविधा असल्याने अशा सर्वाधिक व सुरक्षित विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन डाक अधीक्षक डी. आर. शिवनीकर यांनी केले आहे.

हेही वाचा - शेतकरी बांधवांनो भूक मंदावली, थकवा जाणवतोय; किडनीचा आजार तर जडला नाही ना?

टॅग्स :पोस्ट ऑफिसआरोग्यशेतकरीबीड