Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mango GI Tag : आंबा बागायतदारांसाठी सुवर्णसंधी जीआय मानांकन नोंदणी करा होतील हे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 22:25 IST

कोकण हापूस नावाने अन्य आंब्यांची होणारी विक्री रोखण्यासाठी, कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) देण्यात आले आहे.

रत्नागिरी : कोकण हापूस नावाने अन्य आंब्यांची होणारी विक्री रोखण्यासाठी, कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) देण्यात आले आहे.

'हापूस'च्या नावावर होणाऱ्या विक्रीला बागायतदारांकडून विरोध होत असला तरी मानांकन नोंदणीबाबत अजूनही निराशाच आहे. अद्याप रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ १,८३९ बागायतदारांनी अधिकृत नोंदणी केली आहे.

रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूसला दोन वर्षांपूर्वी जीआय मानांकन मिळाले आहे. देवगडचा हापूस आंबा 'देवगड हापूस' तर रत्नागिरीचा हापूस 'रत्नागिरी हापूस' नावाने ओळखला जात आहे.

रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाल्याने या आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूस आंबा विकता येणार नाही. मात्र, त्यासाठी बागायतदारांना जीआय मानांकनासाठी अधिकृत नोंदणी करणे गरजेचे आहे.

ही नोंदणी केल्यानंतर बागायतदारांना जीआय टॅग लावून आंबा विक्रीसाठी पाठवता येतो. लावलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर मोबाइलमध्ये फळाचे उत्पादक व प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून, जिल्ह्यात २० हजार बागायतदार आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१,२५० हेक्टर क्षेत्र असून, ३४,४५० बागायतदार आहेत. मात्र, जीआय नोंदणीसाठी अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे.

कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादन विक्रेते सहकारी संस्था, केळशी परिसर आंबा उत्पादक संघ, देवगड आंबा उत्पादक संघ हे जीआय मानांकन नोंदणीसाठी बागायतदारांकडे पाठपुरावा करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात ९०० बागायतदार, १४० प्रक्रिया व्यावसायिक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ७९९ बागायतदारांनी नोंदणी केली आहे. उर्वरित बागायतदारांनीही पुढे यावे, असे आवाहन संस्थांकडून सातत्याने केले जात आहे.

बारकोडमुळे कळू शकेल उत्पादकाचे नाव• रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ १,८३९ बागायतदारांनी अधिकृत नोंदणी.• रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाल्याने या आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूस आंबा विकता येणार नाही.• बागायतदारांना जीआय मानांकनासाठी अधिकृत नोंदणी करणे गरजेचे.• नोंदणी केल्यानंतर बागायतदारांना जीआय टॅग लावून आंबा विक्रीसाठी पाठवणे शक्य.• फळासोबत लावलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर मोबाइलमध्ये फळाचे उत्पादक व प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळणार.

आवश्यक कागदपत्रे'जीआय' मानांकनासाठी आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, सातबारा याशिवाय २६०० शुल्क भरावे लागते. या शुल्कामध्ये दहा वर्षे नियंत्रण ठेवणे, आंब्याचा दर्जा पाहणे ही जबाबदारी संस्थेकडे सुपुर्द करण्यात आली आहे. नोंदणीनंतरच नोंदणीकृत व्यक्तींना हापूसचा टॅग किवा फळासोबत बारकोड वापरता येतो.

टॅग्स :आंबाशेतकरीशेतीपीकरत्नागिरीहापूस आंबाहापूस आंबा