Pune : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी गोदावरी हा तुरीचा वाण संजीवनी देणारा ठरत आहे. शेतकरी (Farmres) नव्या लागवड पद्धतीचा आणि नव्या वाणाचा वापर करून एका एकरमधून तब्बल दुप्पट उत्पादन घेत आहेत. त्यामुळे खाजगी कंपन्यांचे महागडे वाण न वापरता शेतकरी गोदावरी या वाणाला पसंती देत आहेत.
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या (VNMKV) बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने गोदावरी हा तुरीचा वाण विकसित केला आहे. या वाण असून पेटंटच्या प्रोसेसमध्ये असूनही या वाणाचे रिझल्ट चांगले येत असल्यामुळे हा वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.
बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील प्रयोगशील शेतकरी बळीराम काळे हे मागील ४ वर्षांपासून गोदावरी तुरीच्या वाणाची (Godavari Tur) लागवड करतात. ते सांगतात की, "चारही वर्षामध्ये माझे वेगवेगळे अनुभव आहेत. या वाणामध्ये मर रोगाचे प्रमाण नाही. जास्त पाणी झाले तरी यावर कोणताच परिणाम होत नाही. मी चोपण जमिनीत, हलक्या जमिनीत, काळ्या जमिनीत या वाणाची टप्प्याटप्प्याने लागवड केली. यातून वेगवेगळा उतारा मला मिळाला."
"त्याबरोबरच मागच्या वर्षी ६ फुटावर तुरीची लागवड केली होती आणि सोयाबीनचे आंतरपीक घेतले होते. तर त्यातून ९ क्विंटल तूर आणि ६ क्विंटल सोयाबीनचे (Soybean) उत्पादन निघाले. यंदा काळ्या जमिनीत तुरीची ८ फुटावर लागवड केली आणि सोयाबीनचे आंतरपीक घेतले तर त्यांना सोयाबीन ८ क्विंटल आणि तुरीचे उत्पादन हे १२ क्विंटल निघण्याची अपेक्षा आहे." असं काळे म्हणाले. म्हणजेच या लागवड पद्धतीमुळे उत्पादनात दोन पटीने वाढ झाली.
गोदावरी वाणाबद्दल शेतकऱ्याचे अनुभव काय?
- चांगल्या जमिनीत चांगले उत्पादन निघते.
- या वाणाला पाणी आवश्यक आहे.
- या वाणामध्ये मर रोगाचे प्रमाण नाही.
- जास्त पाणी झाले तरी यावर कोणताच परिणाम होत नाही.
- तुरीची लागवड दाट पद्धतीने करायची नाही.
- कोरडवाहू जमिनीत अपेक्षित उत्पादन निघत नाही.
- जास्त खतांची गरज नाही.
मी केवळ तीन फवारणी करून गोदावरी तुरीच्या वाणातून चांगले उत्पादन घेत आहे. फक्त या वाणाची लागवड योग्य पद्धतीने व्हायला हवी. शेतकऱ्यांकडे एक किंवा दोन पाण्याची सोय असेल तर गोदावरी हे वाण शेतकऱ्यांना अत्यंत फायद्याचे आहे.- बळीराम काळे (प्रयोगशील शेतकरी, बदनापूर)