कंदवर्गीय फुलपिकांपैकी ग्लॅडिओलस हे एक व्यापारीदृष्टया महत्वाचे फुलपिक आहे. हे पिक मूळचे दक्षिण अफ्रिकेतील परंतू जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये याची लागवड केली जाते. भारतात दिल्ली, कोलकत्ता, मुंबई, बेंगलुरु आणि पुणे यासारख्या मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या परिसरात याची लागवड केली जाते. ग्लॅडिओलसच्या लांब दांड्यावर असणारी आकर्षक रंगीत फुले फुलदाणीत ठेवल्यास सात ते आठ दिवस क्रमाने उमलतात.
हवामान कडक उन्हाळा आणि सतत व जोरदार पावसाचा कालावधी वगळता वर्षभर ग्लॅडिओलस पिकाची लागवड करता येते. तरीही खरीप आणि रब्बी हीच दोन हंगाम प्रमुख समजले जातात. सरासरी २० ते ३० अंश सेंटीग्रेड तापमानात या पिकाची वाढ चांगली होऊन फुलांचे रंगही चांगले येतात. महाबळेश्वर सारख्या ठिकाणी उन्हाळा सौम्य असल्यामुळे हे पिक चांगले येते. या कालावधीत फुलांचा तुडवडा असल्याने बाजारभाव देखील चांगले मिळतात. वर्षभरातील बाजारभाव व फुलांची मागणी यांचा विचार करुन संपूर्ण पिकाची एकाच वेळी लागवड न करता १५ ते २० दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्याने केल्यास फुलांना बाजारभाव चांगला मिळू शकतो.
जमीन मध्यम ते भारी प्रतीची परंतू पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी जमीन या पिकास मानवते. चोपण, खारवट तसेच चुनखडीयुक्त जमीन या पिकास मानवत नाही. सर्वसाधारण जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.
लागवडीसाठी बेणे १. किफायतशीर उत्पादनासाठी योग्य जातींची निरोगी आणि विश्रांती पूर्ण झालेल्या कंदांची निवड करुन कॅप्टन बुरशीनाशक ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळलेल्या द्रावणात बुडवावेत. लागवडीसाठी ४ सेंमी अथवा त्याहून अधिक व्यास असलेले कंद निवडावेत.२. सरी, वरंबा, सपाट वाफे किंवा गादीवाफे पध्दतीने लागवड करता येते. सपाट अथवा गादी वाफा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास दोन ओळीत अंतर ३० सेंमी व दोन कंदांतील अंतर १५ ते २० सेंमी ठेवावे.३. पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने लागवडीनंतर पिकांमध्ये कामाच्या सुलभतेच्यादृष्टीने फुलदांडे सरळ येण्यासाठी आणि फुले येऊन गेल्यावर कंदांचे योग्य पोषण होण्यासाठी सरी-वरंबे पध्दतीने लागवड करणे फायदेशीर ठरते. अशा पध्दतीने लागवड करताना दोन सरीतील अंतर ४० ते ४५ सेंमी व दोन कंदातील अंतर १० ते १५ सेंमी आंतर ठेवून लागवड केली असता हेक्टरी सव्वा ते दिड लाख कंद पुरेसे होतात.
जाती व्यापारीदृष्ट्या लागवडीसाठी योग्य जातींची निवड करणे फार महत्वाचे आहे. उत्तम प्रतिच्या जार निकषामध्ये फुलांचा आकर्षक रंग, फुलदांडयावरील एकूण फुलांची संख्या, कमीत कमी चौदा असाः त्या जातीची किड व रोग प्रतिकारक आणि उत्पादनक्षमता चांगली असावी आणि महत्वाचे म्हणजे ती जात आपण ज्या हवामानात लावणार आहोत त्याठिकाणी चांगली येणारी असावी.
परदेशात आणि भारतात विविध ठिकाणी संकरीत जातींची निर्मिती केली जाते, परंतू सर्वच जाती सर्व ठिकाणी चांगल्या येऊ शकतील असे नाही. याकरीता कोणत्याही जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्याअगोदर त्या बद्दलची तांत्रिक माहिती घेणे आणि शक्यतो थोडया क्षेत्रावर लागवड करुन खात्री करुन घेणे हितावह ठरते. महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत अखिल भारतीय समन्वित पुष्पसंशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे परदेशातील व भारतातील ग्लॅडिओलसच्या विविध जातींचा तुलनात्मक अभ्यास करुन व काही संकरीत जातींची निर्मिती करुन निवड करण्यात आली आहे.
बियाण्याची निवड ग्लॅडिओलसची लागवड कंदांपासून करतात. ग्लॅडिओलस पिकाची यशस्वीता बियाणांच्या निवडीवर अवलंबून असते. कंदाचे मोठे, मध्यम व लहान असे तीन प्रकार असतात. यातील मोठ्या व मध्यम गटातील कंदांच्या फुलदांड्यांचे उत्पादन अधिक येते. लागवडीसाठी शीतगृहात तीन महिने पूर्ण विश्रांती दिलेल्या मध्यम ते मोठ्या कंदांची निवड करावी. साधारणतः हेक्टरी १.२५ ते १.५० लाख कंद लागवडीसाठी लागतात. लागवडीपूर्वी कंदांना बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यासाठी कंद कॅप्टॉप या बुरशीनाशकाच्या ३ ग्रॅ./लि. पाण्याच्या मिश्रणात २०-२५ मिनिटे बुडवून लावावेत.
लागवड ग्लॅडिओलसची लागवड सरी, वरंबा, सपाट अथवा गादी वाफ्यावर करतात. लागवडीसाठी दोन ओळींमध्ये ३० सेंमी. व दोन कंदात १५ ते २० सेंमी. अंतर ठेवावे. पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीने तसेच लागवडीनंतर आंतर मशागतीच्या सुलभतेसाठी व फुलदांडीच्या सरळ वाढीसाठी आणि फुले काढणीनंतर कंदांच्या योग्य पोषणासाठी ग्लॅडिओलसची सरी वरंब्यावर लागवड करणे फायद्याचे ठरते, सरी वरंब्यावर लागवडीसाठी ४५ x १५ सेंमी अंतर ठेवावे. लागवड करताना मातीत ५-७ सेंमी. खोल कंदांची लागवड करावी.
खत व पाणी व्यवस्थापन ग्लॅडिओलसच्या उच्च व चांगल्या प्रतीच्या उत्पादनासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतांची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते. जमीन तयार करताना हेक्टरी ४०-५० टन शेणखत जमिनीच्या गुणधर्मानुसार मातीत मिसळावे. लागवडीच्या वेळी २०० किग्रॅ. स्फुरद व २०० किग्रॅ. पालाश प्रती हेक्टर द्यावे.
३०० किग्रॅ. नत्राची मात्रा लागवडी वेळी अर्ध नत्र व लागवडीनंतर पिकास २, ४ आणि ६ पाने आल्यावर (सुमारे ३, ५ व ७ आठवड्यांनी) उरलेले अर्घ नत्र समान मात्रेत विभागून द्यावे. लागवडीनंतर नियमित परंतु पिकाच्या योग्य प्रमाणात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. जमिनीच्या गुणधर्मानुसार दोन पाण्यातील अंतर ७-८ दविसांचे असावे.
फुले काढल्यानंतर पुढे कंदांच्या वाढीसाठी एक ते दीड महिना पिकाला नियमित पाणी देण्याची आवश्यकता असते. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी वेळोवेळी तणाचा नाश करावा. प्रत्येक खुरपणीच्या वेळी पिकाला मातीची भर द्यावी. त्यामुळे फुलदांडे सरळ वाढण्यास तसेच जमिनीअंतर्गत कंदांच्या वाढीसाठी व पोषणासाठी मदत होते.
फुलांची काढणी व उत्पादन कंदांना दिलेला विश्रांतीचा काळ, आकार व लागवडीसाठी निवडलेल्या जातीनुसार लागवडीपासून सर्वसाधारण ६०-७० दिवसात ग्लॅडिओलसचे फुलदांडे काढणीस तयार होतात. दांडीची एकदा काढणी सुरू झाली की, ती पुढे महिनाभर चालू राहते. फुलदांड्यावरील पहिले फूल रंग दाखवून उमलू लागले की, दांड्याची काढणी करतात. दांडी काढताना मूळ रोपाला ४-५ पाने ठेवून दांडा काढावा.
फुलदांड्याच्या लांबीनुसार व रंगानुसार प्रतवारी करावी. प्रतवारी केलेल्या १२ फुलदांड्याची एक जुडी बांधून त्याच्याभोवती कागद गुंडाळून बांबू अथवा पुड्याच्या खोक्यात १५-२० जुड्या बांधून बाजारपेठेत पाठवितात. प्रतिहेक्टरमधून १.५ ते २ लाख फुलदांड्यांचे उत्पादन मिळते.
कंदाची काढणी व निगा झाडाला ४-५ पाने ठेवूनच ग्लॅडिओलसच्या फुलदांड्याची काढणी करावी. फुलदांड्याच्या काढणीनंतर जमिनीत वाढणाऱ्या ग्लॅडिओलसच्या कंदांचे पोषण सुरू होते व ते पुढे दीड ते दोन महिने चालते. त्यामुळे फुलदांडे काढणीनंतर पिकाला नियमित पाणी द्यावे व योग्य ती आंतर मशागत करावी.
उघडे पडलेले कंद मातीने झाकून टाकावे, झाडाची पाने नैसर्गिक रीत्या पिवळी पडू लागल्यास कंद काढणीस तयार झाले असे समजावे व पिकास पाणी देणे बंद करावे. पुढे जमीन वाफस्यावर आल्यावर कंद काढावेत, कंद काढताना कंदांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी, जातीनुसार कंदांची अलग अशी काढणी करावी. काढलेल्या कंदांची लहान, मोठे व एकदम बारीक अशी प्रतवारी करून त्यांवर कॅप्टॉप बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
त्यासाठी ३ ग्रॅ. कॅप्टॉप एक लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या द्रवणात १५ ते २० मिनिटे कंद बुडवून सुकवावेत. अशी प्रक्रिया केल्यावर कंद चांगल्या कापडी पिशवीत बंद करून लेबल लावून शीतगृहात ७ ते ८० से. तापमानाला ३ महनि ठेवावेत. अशा प्रकारे साठवण केलेल्या कंदांची एकसारखी उगवण होऊन फुलझाडांची गुणवत्ता वाढते. हेक्टरी सु. १.५ ते २ लाख मोठे व इतर लहान कंद मिळतात.
रोग व किड व्यवस्थापन ग्लॅडिओलस या पिकावर कंदकूज हा रोग व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. कंदकूज हा बुरशीजन्य रोग लागवडीत रोगट कंद वापरण्याने होतो. तसेच जमिनीतून पाण्याचा निचरा नसल्यानेही हा रोग फैलावतो. यामुळे पाने पिवळी पडून मरतात. उपाययोजना म्हणून लागवडीसाठी निरोगी कंद वापरावेत. तसेच रोगट झाडे आढळल्यास ताबडतोब कॅप्टॉप द्रावणाची फवारणी करावी.
पाने खाणाऱ्या अळ्या पानांच्या कडा खरवडून खातात किंवा पानांना भोके पाडतात. कधीकधी ही कीड जमिनीलगत रोप कातरते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागवडी वेळी हेक्टरी २० किग्रॅ. फोरेट जमिनीत मिसळावे. तसेच किडीचा प्रादुर्भाव लक्षात येताच २ मिलि. क्विवॉलकॉस एक लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
- डॉ. मोहन शेटे, प्रा. शिवाजी गायकवाड, डॉ. सुनिल लोहाटे (विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे)