Join us

भौगोलिक मानांकनाचा बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 12:09 PM

बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट या नावाने हे मानांकन मिळाले असून त्याचा लाभ सुमारे १५० शेतकऱ्यांना मिळणार आहे.

पालघर जिल्ह्यातील टपोरी जांभळासाठी प्रसिद्ध आलेल्या बहाडोली जांभळाला ३० मार्च रोजी भौगोलिक मानांकन मिळाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने, येथील कृषी क्षेत्राला नव्याने झळाळी मिळाली आहे.

बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट या नावाने हे मानांकन मिळाले असून त्याचा लाभ सुमारे १५० शेतकऱ्यांना मिळणार आहे. यंदाच्या हंगामापासून आकर्षित आवरण, बोधचिन्ह इ.चा वापर करून व्यापारी तत्त्वावर उत्पादन विक्री केल्यास उत्पादित शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यास मदत होईल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकरी गटाला प्रमाणपत्र प्राप्त

  • पालघर हा फळबागायतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. डहाणू तालुक्यातील चिकू फळे प्रसिद्ध असून २०१६ साली डहाणू, घोलवड या नावाने भौगोलिक मानांकन प्राप्त झाले होते. त्यानंतर पालघर तालुक्यातील बहाडोली येथील काळ्या टपोऱ्या रसरशीत जांभळांना भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्याकरिता २०१९ पासून कृषी विभाग आणि 'आत्मा' अंतर्गत जांभूळ उत्पादकांना मार्गदर्शन सुरू केले.
  • बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट स्थापन करण्यात आला. या मानांकनासाठी आवश्यक निकषांची पूर्तता करण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन घेण्यात आले. २३ मे २०२३ रोजी मानांकनासाठी प्रस्ताव तयार करून पाठविला. यानंतर डिसेंबर महिन्यात या प्रस्तावाला मंजुरी मिळून भौगोलिक मानांकन दिल्याचे घोषित करण्यात आले, तर ३० मार्चला बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट या नावाने मानांकनाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
  • लवकरच प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार असल्याने बहाडोली आणि परिसरातील गावांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या भागात सुमारे पाच हजार जांभळाची झाडे असून उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळणार आहे. या औषधी गुणधर्मयुक्त जांभळाच्या बिया, पावडर तसेच वाईन निर्मिती, शिवाय पर्यटन वाढून उत्पादकांना फायदा होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

यावर्षी जांभळाचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेऊन चांगली रसरशीत फळे आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात आणणार आहोत. सोबत भौगोलिक मानांकनाचे स्टीकर लावले जाईल. याकामी कृषी विभाग व आत्मा यांचे सहकार्य नेहमीच होते. - प्रकाश किणी, अध्यक्ष, बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट

टॅग्स :शेतकरीशेतीपालघरफळेबाजारमार्केट यार्ड