Join us

मराठवाड्याच्या टाकळीत साकारले जाणार पहिले बांबू म्युझियम; फळझाडे, औषधी वनस्पतींचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 10:04 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा संकल्प : आर्ट ऑफ लिव्हिंगचा पुढाकारातून लातूर ग्रामीण मध्ये देशातील विविध बांबूच्या प्रजातींची लागवड केली जाणार आहे.

माझं लातूर, हरित लातूर - अभियानअंतर्गत टाकळी ब. येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून दहा हजार वृक्षांची लागवड होत असून, गुरुवारी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपणास प्रारंभ झाला.

तसेच या ठिकाणी लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून 'बांबू म्युझियम' साकारले जाणार असून, त्यात देशातील विविध बांबूच्या प्रजातींची लागवड केली जाणार आहे. तसेच फळझाडे, औषधी वनस्पतींचीही लागवड करण्यात येणार आहे.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, सरपंच मनीषा उपाडे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे महादेव गोमारे, नायब तहसीलदार गणेश सरोदे, तलाठी संदेश राठोड, ग्रामसेवक संदीप राठोड, व्यंकटेश कोरवड, संजय गायकवाड, भास्कर विश्वकर्मा, रोहित सरवदे, कृष्णा नरवडे, आदी उपस्थित होते.

बांबूतून निश्चित, शाश्वत उत्पन्न ...

• गोमारे म्हणाले, केंद्र शासनाच्या बांबू मिशन अंतर्गत देशभरात बांबू लागवड व उद्योगासाठी शासन मोठ्या प्रमाणावर योजना राबवत आहे. टाकळीत साकारणाऱ्या बांबू म्युझियमच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना देशभरातील विविध प्रकारच्या बांबूच्या प्रजातीची माहिती मिळणार आहे. योग्य प्रजातीचे बांबू व त्याचे फायदे समजल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.

• तसेच शेतकऱ्यांना बांबू विक्रीसाठी अथवा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोयीचे जाईल, अशी बांबू म्युझियम निर्मितीची संकल्पना आहे.

•आगामी काळात फर्निचरसाठी बांबू हा सर्वात चांगला पर्याय राहणार आहे. शेताच्या बांधावर बांबू लागवड केल्यास त्यापासून निश्चित, शाश्वत उत्पन्न मिळणार आहे. बांबूमुळे जलसंधारण आणि मातीची होणारी धूप थांबवण्यासाठी मदत होणार आहे.

संवर्धनाची जबाबदारी...

• टाकळी ग्रामस्थांनी बांबू लागवडीसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. झाडांची जोपासना करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे.

• पुढील पिढीच्या भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन आवश्यक असून, त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड आणि संवर्धनात पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

नाटिकेचे सादरीकरण...

• वृक्षारोपणासाठी आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.

• टाकळी ब. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देणारी नाटिका सादर केली. टाकळीत यापूर्वी एकूण ३५ एकरवर वृक्षारोपण करण्यात आले असून, त्याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

हेही वाचा - शेतशिवारात आढळणाऱ्या बहुपयोगी पळसाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे

टॅग्स :आर्ट आॅफ लिव्हिंगग्रामीण विकासबांबू गार्डनशेती क्षेत्रलातूरमराठवाडा