Join us

आधार कार्ड आणि ई-पॉस मशीनद्वारेच यंदा खत विक्री: बनावट खत विक्रीवर लागणार लगाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 15:09 IST

नवीन खत वितरण प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करताना अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया अनुभवता येणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना स्वतःचा आधारकार्ड सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवीन खत वितरण प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करताना अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया अनुभवता येणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना स्वतःचा आधारकार्ड सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सर्व खत विक्री ई-पॉस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल) मशीनद्वारेच करण्यात येणार आहे.

खत वितरण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि बोगस खत विक्रीला आळा घालण्यासाठी खत उत्पादक कंपन्यांमार्फत कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली नवे ई-पॉस मशीन विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना ई-पॉस मशीनवर स्वतःची नोंदणी करावी तसेच खरेदीचे अधिकृत बिल घ्यावे असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

या प्रक्रियेमुळे बनावट खत विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येणार असून खत नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास अधिक मदत होणार आहे. याशिवाय ई-पॉस प्रणालीवर नोंदवलेला साठा आणि प्रत्यक्ष दुकानातील साठा यामध्ये काही विसंगती आढळल्यास संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे खते खरेदी करताना सावध राहावे, बनावट खत किंवा दरांमध्ये फसवणूक झाल्यास तात्काळ स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ही नवी व्यवस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी असून त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : गोटखिंडी येथील थोरात बंधूंनी घेतला आधुनिक शेतीचा ध्यास; केळीतून वर्षाला घेताहेत ६० लाखांचं उत्पन्न

टॅग्स :खतेशेतकरीशेतीशेती क्षेत्रकोल्हापूरसरकार