Join us

धावडा-वालसावंगी येथील मेथीची बऱ्हाणपूरसह अकोला, नागपूर, पुणेकरांना गोडी....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 16:03 IST

शेतकरी आता मेथीची भाजी काढून विक्री करीत आहेत. मात्र, अकोला, नागपूर, पुणे आणि बऱ्हाणपूरच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी थेट तेथे खासगी वाहनाने जाऊन मेथीची भाजी विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.

फकिरा देशमुख :धावडा : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी, धावड्यासह परिसरातील शेलूद, लिहा, पारध, विझोरा, वडोद तांगडा, भोरखेडा येथील शेतकऱ्यांनी परतीचा पाऊस येण्यापूर्वी भाजीपाल्याची लागवड केली आहे.

यात शेतकरी आता मेथीची भाजी काढून विक्री करीत आहेत. मात्र, अकोला, नागपूर, पुणे आणि बऱ्हाणपूरच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी थेट तेथे खासगी वाहनाने जाऊन मेथीची भाजी विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.

या ठिकाणी एका जुडीला २०-३० रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती जिल्ह्यातील काही शाकाहारी हॉटेल चालकही थेट शेतात येऊन मेथीची भाजी घेऊन जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

मेथीच्या भाजीला चांगला भाव मिळत असल्याने अनेक किरकोळ व्यापारी वालसावंगी, धावडा येथील उत्पादक शेतकऱ्यांकडून जागेवरच भाजी खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. भोकरदन तालुका भाजीपाला लागवडीसाठी प्रसिद्ध असल्याने यंदा शेतकरी मेथी, कोथिंबीर लागवडीकडे वळल्याचे दिसून येत आहे.

एवढेच नव्हे तर अनेक शेतकरी कपाशीच्या शेतात मेथी आणि कोथिंबीर लागवडीवर भर देतात. यंदा मिरचीवर चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेकांनी मिरची उपटून भाजीपाल्याची लागवड केल्याचे दिसून येत आहे. सध्या मार्केटमध्ये चांगला भाव असल्याने खेड्यापाड्यासह शहरी भागातही २० रुपये जुडीने मेथीची भाजी विक्री केली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना होतोय फायदा

सोयाबीन, कपाशी, मका पिकाला चांगला भाव मिळत नसल्याने या पिकाकडे शेतकरी दुर्लक्ष करीत आहेत. भाजीपाल्यातून तत्काळ पैसे वसूल होतात. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात मेथीची लागवड केली आहे. त्याचा आता फायदाही होत आहे. - नामदेव गवळी, भाजी उत्पादक शेतकरी, वालसावंगी

आवक घटल्यास भावात तेजी राहणार

सध्या नागपूर, अकोला, पुणे, बऱ्हाणपूर येथील मार्केटमध्ये कमी आवक झाल्यामुळे एक मेथीची जुडी २० ते ४० रुपयांपर्यंत मिळत आहे; परंतु आणखी आवक घटल्यास मेथीच्या भावात तेजी कायम राहणार आहे. तीन महिन्यात येणारे हे पीक असल्याने अनेक शेतकरी याकडे वळले आहेत. - गुलाब पठाण, भाजीपाला व्यापारी धावडा.

टॅग्स :शेती क्षेत्रभाज्याजालनाशेतकरीशेती