बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासनाच्या नियमानुसार प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांतील शेतकऱ्यांना विविध कृषी निविष्ठांचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे.
यावर्षी कृषी निविष्ठांचे वितरण अधिक प्रभावी आणि वेळेत व्हावे यासाठी कृषी विभागाकडून थेट शेताच्या बांधावर हे साहित्य पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना पिकांवर वेळेवर उपाययोजना करता याव्यात यासाठी चिकट सापळे, कामगंध सापळे, जैविक औषधे, निंबोळी अर्क, सूक्ष्म मूलद्रव्ये आदींचे वेळेत वितरण होणे अत्यावश्यक असते; मात्र मागील वर्षी काही गावांमध्ये निविष्ठा वाटपास उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
यावर्षी अधिक दक्षता !
• यावर्षी शासनाकडून प्राप्त उद्दिष्टानुसार प्रकल्पांतर्गत गावांना कृषी निविष्ठांचे वितरण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे.
• शक्य तितक्या प्रमाणात हे साहित्य थेट शेतकऱ्यांच्या शेतावर किंवा बांधावर पोहोचवण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळेत योग्य उपाय करता येणार असून, उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयास यापूर्वी विविध प्रकल्पांतर्गत निविष्ठा प्राप्त झाल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी व सहायक कृषी अधिकाऱ्यांमार्फतच त्यांचे वितरण झाले आहे. काही व्यक्तींनी निविष्ठा न मिळाल्याचा किंवा नंतर ती जाळल्याचा आरोप केला आहे, मात्र अशा प्रकारचा कोणताही अपप्रकार कार्यालयाकडून घडलेला नाही. - संध्या करवा, तालुका कृषी अधिकारी बार्शीटाकळी, जि. अकोला.
हेही वाचा : आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप