Join us

शेतात राबणाऱ्या हाताने घडणार शेतकरी; मराठवाड्याच्या 'या' शेतकऱ्याची मास्टर ट्रेनर म्हणून निवड

By दत्ता लवांडे | Updated: May 18, 2025 13:39 IST

ज्या हाताने मागील कित्येक वर्ष शेतात काबाडकष्ट केले, समाजसेवा केली, पर्यावरणासाठी काम केलं आणि जास्तीत जास्त सेंद्रिय शेतकरी तयार करण्याचा प्रयत्न केला तेच हात शेतकऱ्यांना घडवण्यासाठी आता काम करणार आहेत. बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील बळीराम काळे यांची शेतकरी मास्टर ट्रेनर म्हणून निवड झाली आहे.

ज्या हाताने मागील कित्येक वर्ष शेतात काबाडकष्ट केले, समाजसेवा केली, पर्यावरणासाठी काम केलं आणि जास्तीत जास्त सेंद्रिय शेतकरी तयार करण्याचा प्रयत्न केला तेच हात शेतकऱ्यांना घडवण्यासाठी आता काम करणार आहेत. जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील बळीराम काळे यांची शेतकरी मास्टर ट्रेनर म्हणून निवड झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून ते आपल्या शेतावर सेंद्रिय शेतीचे विविध प्रयोग करत आहेत.  

ज्या शेतकऱ्याच्या शेतावर प्रत्यक्ष परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू येऊन गेले, विद्यापीठाच्या कोणत्याही नव्या वाणाचा प्रयोग ज्या शेतकऱ्याच्या शेतात होतो आणि शेतीमधील कुठलेही नवे तंत्रज्ञान अवगत करण्याची क्षमता असलेले शेतकरी म्हणजेच जालन्यातील बळीराम काळे. दादा लाड तंत्रज्ञान पद्धतीने कापूस लागवड असो, की कुठल्याही नवीन वाणाची लागवड असो बळीराम हे कायमच पुढे असतात. त्यांच्या या कष्टाला अखेर फळ मिळाले आहे.

राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राज्याच्या कृषी विभागाकडून महाराष्ट्रात शेतकरी मास्टर ट्रेनर ची निवड करण्यात आली आहे. जे शेतकरी आपल्या शेतावर अनेक वर्षांपासून नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने शेती करतात अशा शेतकऱ्यांची निवड महाराष्ट्रभरातून करण्यात आलेली आहे.  महाराष्ट्रातून निवडलेल्या विविध मास्टर ट्रेनर्सना गुजरात येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

दरम्यान, बाजार वाहेगाव हे गाव कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांनी दत्तक घेतले असून या गावात अनेक वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. बळीराम काळे यांनी २०१७ मध्ये आत्मा अंतर्गत सेंद्रिय कृषी क्रांती शेतकरी गटाची स्थापना करून २० शेतकऱ्यांच्या साहाय्याने प्रति शेतकरी एक एकर सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. त्या माध्यमातून त्यांनी विषमुक्त अन्न पिकवायला सुरुवात केली. 

शेतकरी गटाचे काम पाहून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत बाजार वाहेगाव येथे नैसर्गिक फार्मर प्रोडूसर कंपनी स्थापन करण्यात आले आणि त्याचे अध्यक्षपद बळीराम भाऊ काळे यांना देण्यात आले. या अंतर्गत बळीराम यांनी प्रत्येकी ५० शेतकऱ्यांचा एक असे १० गट तयार केले आणि एकूण ५०० शेतकऱ्यांना या शेतकरी उत्पादक कंपनीला जोडून घेतले.

या योजनेअंतर्गत बळीराम काळे यांच्या कृषी संगम शेतकरी उत्पादक कंपनीने उल्लेखनीय काम केले आहे. शेतकऱ्यांना घरच्या घरी सेंद्रिय निविष्ठा तयार करणे आणि सेंद्रिय शेतमाल उत्पादनासाठी योग्य मार्गदर्शन करण्याचे काम आतापर्यंत झाले आहे. या सर्व कामासाठी कृषी विज्ञान केंद्र बदनापूर आणि डॉ. सोमवंशी सरांचे मोठे मार्गदर्शन लाभल्याचे बळीराम भाऊ सांगतात.

तर राज्यभरातून निवडलेल्या मास्टर ट्रेनर्स चे प्रशिक्षण गुजरात येथे होणारा असून त्यानंतर राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत हेच शेतकरी इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांना आणि गटांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा : 'या' विद्यार्थ्याने वयाच्या २३ व्या वर्षी १७ पेटंट कसे मिळवले? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनकीड व रोग नियंत्रणकापूसमराठवाडावसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ