अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यात कापूस खरेदी करताना मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. संतप्त गावकऱ्यांनी संबंधित व्यापारी व त्याच्यासोबतच्या माणसांना इंगा दाखवला असता, ट्रकचालक व हमाल घटनास्थळावरून पळून गेल्याची घटना आसेगाव बाजार येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आसेगाव बाजार येथील शेतकरी संदीप माणिकराव धांडे यांच्या घरून कापूस खरेदी करण्यासाठी एक व्यापारी ट्रक व हमालांसह आला होता. व्यापाऱ्याने आधी रिकाम्या ट्रकचे वजन इलेक्ट्रॉनिक काट्यावर करून घेतले आणि त्यानंतर शेतकऱ्याचा कापूस ट्रकमध्ये भरायला सुरुवात केली.
कापूस भरत असताना ट्रकच्या बॉडीवरून शेतकऱ्याला संशय आल्याने त्यांनी ट्रकच्या खाली पाहणी केली. त्यावेळी मोजमापात फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला.
फसवणुकीचा प्रकार असा उघडकीस
• कापूस व्यापाऱ्याने ट्रकच्या खाली वाळू भरता येतील अशा पेट्या तयार करून ठेवल्या होत्या. प्रथम रिकाम्या ट्रकचे वजन करून घेतल्यानंतर रस्त्यातून येताना त्या पेट्यांमधील वाळू खाली टाकण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्याचा कापूस ट्रकमध्ये भरून पुन्हा वजन केले जात होते.
• यामुळे आधीचे व नंतरचे वजन यामध्ये तफावत निर्माण होऊन शेतकऱ्यांचा कापूस कमी दाखवला जात होता; मात्र शेतकरी संदीप धांडे यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. संबंधित व्यापारी मोर्शी येथील असल्याचे व ट्रक धुळे येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
उडवाउडवीची उत्तरे
याबाबत शेतकरी व गावकऱ्यांनी व्यापाऱ्याला आणि ट्रक चालकाला जाब विचारला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, गावकऱ्यांचा संताप वाढल्याचे पाहून ट्रकचालक व हमाल घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.